मुंबईत पाच विभागांत एक हजारापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरोधात पालिकेने दंडात्मक कारवाईबरोबर गुन्हे दाखल करणे सुरू केले आहेत. मात्र मुंबईकरांच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढली असून बोरिवली, कांदिवली, अंधेरी (प.), अंधेरी (पू.) आणि मुलुंड या पाच विभागांत सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारापेक्षा जास्त वाढल्यामुळे पालिका सतर्क झाली आहे. दरम्यान, रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी कमी होऊन 124 दिवसांवर आला आहे.

मुंबईत फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. सध्या मुंबईत रोजची रुग्णसंख्या दोन हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईत सध्या 90 टक्के रुग्ण हे इमारती, मोठे रहिवासी संकुल आणि उच्चभ्रू वस्तीमध्ये सापडत आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट, कार्यक्रम, नाईट क्लब, लग्न समारंभ आणि गर्दीच्या ठिकाणी विनामास्क फिरणाऱया आणि गर्दी करणाऱयांविरोधात दंडात्मक आणि फौजदारी गुन्हा दाखल केले जात आहेत, मात्र लोकांचा बेजबाबदारपणा काही कमी झालेला नाही.

त्यामुळे गुरुवारी एकाच दिवसात तब्बल 2 हजार 877 रुग्ण सापडल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे. त्याबरोबर कोरोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. बोरिवली, कांदिवली, अंधेरी (पूर्व-पश्चिम) आणि मुलुंड या भागात एक हजाराहून अधिक सक्रिय रुग्ण आहेत तर ए, सी विभाग व सॅण्डहर्स्ट रोड येथे सर्वात कमी सक्रिय रुग्ण आहेत.

सर्वाधिक सक्रिय रुग्णांची नोंद
बोरिवली 1180
अंधेरी (प.) 1804
अंधेरी (पूर्व) 1168
कांदिवली 1137
मुलुंड 1246