मालाडमध्ये फ्लॅटला आग; तरुणी थोडक्यात बचावली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मालाड पश्चिम येथील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये भीषण आग लागली. हा फ्लॅट बंद असला तरी बाजूच्याच फ्लॅटमध्ये आग पसरल्याने एक तरुणी गॅलरीत अडकली. स्थानिकांनी शिडी लावून तिची वेळेत सुटका केल्याने ती वाचली.

मालाड पश्चिम, जनकल्याण नगर येथील मरिना एनक्लेव्ह या  21 मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील बंद स्थितीत असलेल्या एका फ्लॅटमध्ये शनिवारी सकाळी 10.45 वाजताच्या सुमारास आग लागली. या फ्लॅटच्या गॅलरी, खिडकीमधून मोठय़ा प्रमाणात आगीच्या ज्वाळा आणि धूर बाहेर पडत होता. आगीच्या ज्वाळा वरील मजल्यापर्यंत पोहोचत होत्या. इमारतीला आग लागल्याचे समजताच रहिवाशांनी तत्काळ इमारतीबाहेर धाव घेऊन सुरक्षित जागा गाठली. दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाने काही वेळातच संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. आग कशामुळे लागली याचा तपास अग्निशमन दल, पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.