वाढदिवशी तलावात बुडून तरुणाचा मृत्यू, मुंबईतील चारकोप येथील दुर्दैवी घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढदिवसाच्या दिवशी तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना चारकोप गाव परिसरात घडली. बाळकृष्ण अशोक काउनकर असे मृताचे नाव आहे. घडल्याप्रकरणी चारकोप पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

बाळकृष्ण हा चारकोप गाव परिसरात राहत होता. रविवारी त्याचा वाढदिवस होता. सायंकाळी तो त्याच्या एका मित्रासोबत पोहण्यासाठी चारकोप येथील दिंगेश्वर तलाव येथे गेला होता. सायंकाळी ते दोघे तलावात पोहत असताना बाळकृष्णला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. हा प्रकार त्याच्या एका मित्राच्या लक्षात आल्यावर तो त्याला वाचवण्यासाठी गेला. तो देखील बुडत असल्याचे पाहून एका स्थानिक गावकऱयाने तलावात उडी मारून तरुणाचे प्राण वाचवले. त्या तरुणाला सुखरूप बाहेर काढले. याची माहिती स्थानिकांनी अग्निशमन दल आणि चारकोप पोलिसांना दिली. काहीच वेळात चारकोप पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आले.

अग्निशमन दलाचे जवान हे बाळकृष्णचा शोध घेत होते. रात्री अंधारामुळे शोधमोहिमेत अडथळे येत होते. बाळकृष्णचा शोध घेण्यासाठी सोमवारी पोलिसांनी नौदलाची मदत घेतली. 14 तासांनंतर नौदलाने बाळकृष्णचा मृतदेह तलावातून बाहेर काढला. सायंकाळी पोलिसांनी बाळकृष्णचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. वाढदिवसाच्या दिवशीच अपघाती मृत्यू झाल्याने चारकोप गाव परिसरात शोककळा पसरली आहे.चारकोप पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून बाळकृष्णच्या नातेवाईकाचा जबाब नोंदवून घेतला.