जगभरात मुंबईकर घेतात सर्वात कमी सुट्ट्या; सर्वेक्षणातील निष्कर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई हे नेहमी धावणारे शहर आहे. नेहमी 24 तास जागणारे हे शहरआहे. या शहराला आराम किंवा झोप या गोष्टीच माहित नाहीत. या शहरातील सर्व लोक कामात नेहमी व्यस्त असतात. जगभरात मुंबईकर सर्वात कमी सुट्ट्या घेतात असे एका सर्वेक्षणातून उघड झाले आहे. शहरात राहणाऱ्या लोकांवर कामाचा एवढा ताण असतो की, दिवसाचा ठराविक वेळही ते कुटुंबाला दऊ शकत नाही, तर सुटी घेऊन बाहेरगावी जाणे शहरातील लोकांना शक्यच नसते. त्यामुळे सर्वात जास्त काम करणारे आणि कमीतकमी सुट्ट्या घेणारे मुंबईकर आहेत, असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

कार्यालयातील कामातून वेळच मिळत नाही, त्यामुळे शहरातील सुमारे 51 टक्के लोक सुट्ट्याच घेत नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर सुट्ट्या घेण्यापेक्षा त्याचे पैसे घेण्याकडे सुमारे 40 टक्के लोकांचा कल असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पैशांच्या परताव्यामुळे असे लोक सुटी घेत नाहीत. तर कार्यालयाच्या कामामुळे सुटी घेता येत नसल्याचे 88 टक्के मुंबईकरांनी सांगितले. मुंबईतील 27 टक्के लोकांनी वर्षभरात एकही सुटी घेतलेली नाही. 44 टक्के लोकांनी वर्षभरात 10 दिवसांपेक्षा कमी सुट्ट्या घेतल्या आहेत. वर्षभरात 10 पेक्षा कमी सुट्ट्या घेणाऱ्यांमध्ये दिल्लीकरांचा दुसरा क्रमांक लागतो. नवी दिल्लीत वर्षभरात 43 टक्के लोकांनी 10 पेक्षा कमी सुट्ट्या घेतल्या आहेत.

सुट्ट्या न घेता काम करणे हे मुंबईकर यशस्वी होण्याचे लक्षण मानतात. यशस्वी व्यक्ती कधीही सुटी घेत नाही असे मुंबईकरांचे मत असल्याचेही सर्वेक्षणातून उघड झाले आहे. मात्र, कामाच्या व्यापातही मुंबईकर आरोग्याकडे विशेष लक्ष देत असल्याचे आढळून आले आहे. आरोग्यासाठी सुटी घेणाऱ्यांचे प्रमाण शहरात जास्त आहे. सुमारे 92 टक्के मुंबईकर मानसीक शांततेसाठी सुटी घेतात. तर अशी सुटी घेणे अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी गरजेचे असल्याचे 97 टक्के मुंबईकरांनी सांगितले.