शिवसेनाप्रमुखांना पालिकेची अनोखी श्रद्धांजली, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांमुळे घराजवळच उपचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील गोरगरीबांना आता घराजवळच पालिकेचे दर्जेदार आणि अद्ययावत उपचार मोफत उपलब्ध होणार आहेत. १४७ प्रकारच्या विविध रक्त चाचण्या आणि अनेक प्रकारच्या आजारांवर या ठिकाणी मोफत उपचार करण्यात येणार आहेत. ‘पोर्टा केबीन’ स्वरूपात सुरू होणार्‍या या विशेष दवाखान्यांचे लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या करण्यात आले.

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ५१ दवाखाने सुरू होणार असून एकूण २२० दवाखाने सुरू केले जाणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ धारावीत सुरू करण्यात आलेल्या दवाखान्यापासून करण्यात आला.

मुंबईकरांना दर्जेदार आणि अद्ययावत सुविधा देण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने’ सुरू करण्याची घोषणा यावर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. याची अंमलबजावणी पालिकेकडून करण्यात येत आहे.

धारावी परिसरातील शीव–वांद्रे लिंक रोड नजिक असणार्‍या ‘ओएनजीसी’ इमारतीच्या प्रवेशद्वार क्रमांक २ जवळील दवाखान्यापासून ही सुविधा सुरू झाली. यावेळी इतर ५० दवाखान्यांचे लोकार्पणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. या उपक्रमात पुढील ६ महिन्यांतया दवाखान्यांची संख्या २२० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. हे दवाखाने उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेत पोर्टा केबिनमध्ये कार्यान्वित करण्यात येत आहेत. तर काही दवाखाने हे सध्या उपलब्ध असलेल्या दवाखान्यांच्या जागेत सुरू करण्यात येत आहेत.

१४७ प्रकारच्या रक्तचाचण्या मोफत

– या दवाखान्यांमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ जखमांवर मलमपट्टी आणि तब्बल १४७ प्रकारच्या रक्तचाचण्या मोफत करण्यात येणार आहेत.

– याशिवाय क्ष-किरण चाचणी (एक्स रे), सोनोग्राफी यासारख्या चाचण्यांकरिता पॅनलवर असणार्‍या वैद्यकीय चाचणी केंद्रांमधून करण्यात येणार आहेत.

– विशेष म्हणजे या चाचण्या जरी खासगी केंद्रातून करण्यात येणार असल्या तरी त्या महानगरपालिका रुग्णालयांच्या दरानुसार शुल्क आकारणी करून करण्यात येणार आहेत.

३० हजार लोकसंख्येसाठी १ दवाखाना

– हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे प्राथमिक आरोग्य सेवा सक्षमीकरण योजनेमुळे नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा मोफत व सोईच्या वेळेनुसार सहज उपलब्ध होणार आहे. या योजनेत सुमारे २५ ते ३० हजार लोकसंख्येसाठी १ दवाखाना सुरू होईल. हे सकाळी ७ ते दुपारी २, त्यानंतर दुपारी ३ ते रात्री १० या कालावधीत सुरू राहणार आहेत. तर उपलब्ध दवाखान्यांमध्ये सुरू करण्यात आलेले दवाखाने हे सकाळी ९ ते दुपारी ४ आणि दुपारी ३ ते रात्री १० या वेळेत सुरू राहतील. या दवाखान्यात कंत्राटी तत्त्वावर वैद्यकीय अधिकारी, १ परिचारिका, १ औषध निर्माता आणि १ बहुउद्देशीय कामगार यांची नेमणूक करण्यात आली आहे.

स्पेशालिस्ट डॉक्टरही उपलब्ध करणार

– शिवाय विशेष तज्ज्ञांच्या माध्यमातून पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर उपलब्ध करण्यात येईल. शिवाय या दवाखान्यात कान-नाक-घसा तज्ज्ञ, नेत्रचिकित्सा, स्त्री-रोग तज्ज्ञ, वैद्यकीय तपासणी तज्ञ, फिजिओथेरपिस्ट, त्वचा रोग तज्ज्ञ, दंतशल्य चिकित्सा, बालरोग तज्ज्ञांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात येतील. दवाखान्यात पॉली क्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटर मार्फत सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत देण्यात येणार आहे.

पेपरलेस कारभार

– या दवाखान्यांमधून टॅब पद्धतीने व सॉफ्टवेअरच्या माध्यमातून रुग्णांची माहिती, आजाराचा तपशील, औषधांचा साठा व वितरण तसेच संदर्भित केलेल्या निदान सुविधा यांचा तपशील नोंदविण्यात येईल, ज्यायोगे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखानेचे कामकाज हे विना कागद पद्धतीने (पेपरलेस) असणार असून त्यामुळे हे दवाखाने इकोफ्रेन्डली देखील असणार आहेत, असेही सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळविण्यात आले आहे.