
सेल्फी काढण्यासाठी स्टंट करण्याच्या घटना अजूनही काही ठिकाणी घडत आहेत. उत्तर प्रदेशमधील जनपद मुजफ्फरनगर येथेही अशाच प्रकारे चालत्या कारमध्ये उभे राहून सेल्फी काढणाऱ्या एका नवरदेवाला पोलिसांकडून चांगलाच भुर्दंड पडला आहे.
उत्तर प्रदेशातील जनपद मुजफ्फरनगर येथील राष्ट्रीय महामार्ग- 58 येथे आलिशान कारमधून काही तरुण सेल्फी घेतात. सेल्फी घेताना ते कारच्या खिडक्या आणि सनरूफमधून बाहेर पडून सेल्फी घेतात. यावेळी वाहनांच्या ताफ्यात रिकाम्या गाडीत उभे राहून एका नवरा चक्क चालत्या गाडीतून सेल्फी काढत होता. मिरवणुकीच्या ताफ्यात चालत्या कारमध्ये एकटेच उभे राहून सेल्फी काढण्याचा स्टंट करणाऱ्या नवऱ्याचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
मुझफ्फरनगर जिल्ह्यातील दिल्ली डेहराडून राष्ट्रीय महामार्ग-58 अंतर्गत छपर पोलीस स्थानक परिसरात 12 जून रोजी अंकित कुमार या तरुणाने त्याच्या मोबाईलमधून या प्रसंगाचे चित्रीकरण केले होते. हे व्हिडियो त्याने त्याच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले होते. मुझफ्फरनगरचे एसएसपी अभिषेक यादव यांनी अंकित कुमारने पोस्ट केलेल्या या व्हिडियोची दखल घेतली. या व्हिडियोच्या आधारे वाहतूक पोलिसांनी 9 वाहनांचे नंबर ट्रेस करून चालत्या कारमधून सेल्फी काढणाऱ्या नवऱ्याला 2 लाख 2 हजार रुपयांचे चलन पाठवले. एवढेच नाही तर मुझफ्फरनगर पोलिसांनी अशा प्रकारे स्टंटबाजी करून सेल्फी काढणाऱ्या लोकांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.
या घटनेबाबत वाहतूक पोलीस कुलदीप सिंग यांनी माहिती दिली की, काल (सोमवारी) काही तरुण त्यांच्या वाहनांचे सनरूफ उघडे ठेवून कारच्या बाहेर उभे होते आणि खिडक्यांमधून बाहेर डोकावून सेल्फी काढत होते. याची दखल वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. पोलिासांनी काही वाहनांवर खुणाही केल्या आहेत. अशा प्रकारे स्टंटबाजी करून सेल्फी काढणाऱ्यांविरोधात संबंधित कलमांतर्गत कारवाई करण्यात येत आहे.



























































