वडिलांमुळे यष्टिरक्षणाकडे वळलो! रिषभ पंतने सांगितला किस्सा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माझ्या यष्टिरक्षणाबाबतचे मत चाहत्यांना ठरवू देत. मी प्रत्येक सामन्यात 100 टक्के चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहे. मी यष्टिरक्षक का झालो? असा सवाल अनेकजण मला विचारतात. त्याचे कारण माझे वडील यष्टिरक्षकच होते. त्यांच्यासोबत खेळताना मीदेखील यष्टिरक्षक झालो. माझ्या वडिलांना पाहून माझा यष्टिरक्षणाच्या दिशेने प्रवास सुरू झाला, असा यष्टिरक्षक होण्यामागचा किस्सा रिषभ पंतने सांगितला.

हिंदुस्थानी संघ 9 जून पासून दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ सज्ज झाला असून मैदानावर कसून सराव करताना हिंदुस्थानी खेळाडू दिसत आहेत. मात्र, या मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली आहे. रोहितच्या ऐवजी के. एल. राहुल याच्या खांद्यावर संघाच्या कर्णधारपदाची, तर रिषभ पंत याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

तू यष्टिरक्षक का झालास? असा सवाल पंतला विचारला असता त्याने हा किस्सा यावेळी सांगितला. रिषभचा संघात यष्टिरक्षक फलंदाज म्हणून समाविष्ट झाला होता. सुरुवातीला तो केवळ फलंदाजीसाठी ओळखला जायचा. नंतर त्याने आपल्या कामगिरीत सुधारणा करत उत्तम यष्टिरक्षक म्हणून नाव कमावले. चांगला यष्टिरक्षक व्हायचे असेल तर तुम्ही स्वतःला चपळ ठेवायला हवे. जर तुम्ही पुरेसे चपळ असाल तर तुम्ही सर्वोत्तम कामगिरी करू शकाल. चेंडू शेवटपर्यंत पाहणे महत्त्वाचे असते. कधीकधी असे होते की चेंडू तुमच्या दिशेने येतोय हे आम्हाला माहीत असते. त्यामुळे आम्ही रिलॅक्स राहतो, असेही रिषभने स्पष्ट केले.