
देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. ही लाट आधीच्या लाटेपेक्षा अधिक भयंकर असल्याचे सांगितले जात आहे. नगर जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता संसर्ग आणि दररोज कोरोनाबाधित रुग्णांची आरोग्य यंत्रणेकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात येत असलेली संख्या पाहता, गतवर्षीपेक्षा या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापासून सुरू झालेली दुसरी लाट मोठी असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून रोज दोन हजारांच्या पुढे रुग्ण सापडत असून, ऑक्टिव्ह रुग्णसंख्या 16 हजारांच्या पुढे गेली आहे.
नगर जिल्ह्यात गतवर्षी मार्चमध्ये कोरोनाचा पहिला बाधित रुग्ण आढळला होता. दोन महिन्यांच्या लॉकडाऊननंतर 31 मे 2020 रोजी जिल्ह्यातील बाधित रुग्णसंख्या अवघी 120 होती, तर सहा मृत्यू झाले होते. 1 जूनपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल होत गेले आणि कोरोनाचा संसर्ग वाढू लागला. जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कोरोनाचा मोठा विस्फोट झाला होता. तरीही दररोज आढळणारी रुग्णसंख्या एक हजारच्या आसपास होती. त्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध होत होते. योग्य वेळी उपचार मिळत होते. सध्याची परिस्थिती पाहता, गेल्या काही दिवसांपासून दररोज आढळणारी रुग्णसंख्या एक हजारच्या पुढे गेली आहे. एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर तर दररोज दोन हजारांच्या पुढे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 16 हजारांच्या पुढे गेली आहे.
30 दिवसांत 31 हजार 880 रुग्ण
कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीच्या मध्यापासून सुरू झाली असली, तरी जास्त उद्रेक मार्चमध्ये पाहावयास मिळाला. गेल्या 30 दिवसांत 10 मार्च ते 9 एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात एकूण 31 हजार 880 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यातील 17 हजार 425 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर 111 जणांचा बळी गेला आहे. मार्चपेक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे.
यंत्रणेवर पडतोय दुहेरी ताण
आरोग्य यंत्रणेवर दुहेरी ताण पडत आहे. एकीकडे चाचणी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहत आहे. डॉक्टरांना फुप्फुसे, श्वसन प्रणाली, पोट आदींसारख्या अनेक तक्रारींवर उपचार करावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर नियमांचे महत्त्व आणखी वाढले आहे.
रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे
नवीन कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर ताप, अंगदुखी, खोकला, श्वास घेण्यास अडचण आदी पूर्वीच्या लक्षणांसह पोटात दुखणे, उलटय़ा होणे, मळमळणे, सर्दी अशी लक्षणेही दिसत आहेत. तर काही रुग्णांमध्ये कोरोनाची सामान्य लक्षणेदेखील दिसत नाहीत. कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून बरेच डॉक्टर आता लोकांना संपूर्ण लक्षणे दिसत नसली, तरीही कोविड चाचणी करून घेण्याचा सल्ला देत आहेत. कारण बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे दिसतच नाहीत किंवा अतिशय सौम्य लक्षणे दिसत आहेत. मात्र, आताचा विषाणू अधिक घातक असल्याने गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची अधिक आवश्यकता भासत आहे. परंतु या रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध व्हायला प्रचंड अडचणी येत आहेत.



























































