
दिवसभराच्या अनेक नाटय़मय घडामोडींनंतर नगर अर्बन बँकेच्या निवडणुकीतून बँक बचाव कृती समितीच्या पॅनेलने शुक्रवारी आश्चर्यकारक माघार घेतली. त्यामुळे सहकार पॅनेलने बँकेवर एकहाती वर्चस्व मिळविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या पॅनेलचे चारजण बिनविरोध निवडले गेले आहेत. तर, आता निवडणूक रिंगणात राहिलेल्या 14 जागांसाठी 21 जण उरले असल्याने या जागाही सहकार पॅनेल जिंकण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, बँक बचाव पॅनेलने मागील महिनाभरापासून बँक निवडणुकीत विविध पोस्टच्या माध्यमातून हवा तापवली होती. त्यामुळे बचाव पॅनेल व सहकार पॅनेलमध्ये जोरदार लढतीची अपेक्षा होती; पण बचाव पॅनेलने माघार घेतल्याने सभासदांतून नाराजी व्यक्त होत आहे.
नगर अर्बन बँकेच्या 18 जागांसाठी 28 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. निवडणूक रिंगणात बँक बचाव पॅनेल व सहकार पॅनेलसह काही स्वतंत्र उमेदवारांनीही अर्ज दाखल केले होते. सुमारे 90च्यावर अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. त्यात बँक बचाव कृती समितीच्या पॅनेलने मागील सत्ताधारी असलेल्या सहकार पॅनेलमुळे ही निवडणूक बँकेवर लादल्याचा दावा करून मागील सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर सोशल मीडियातून विविध भाष्यही केले होते. मात्र, यामुळे बँकेची बदनामी होत आहे. तसेच, बँक आर्थिक अडचणीत असल्याने निवडणूक बिनविरोध करावी, आपसातील कटुता टाळावी, असा सूर काही सभासदांतून व्यक्त होत होता. तसे प्रयत्नही सुरू होते; पण हे सारे प्रयत्न फोल ठरले. अखेर बँक बचाव पॅनेलमधून उमेदवारी दाखल केलेल्यांपैकीही काहीजणांनी लढण्यास असमर्थता दर्शविल्याने व त्यापैकी काहींनी आपले अर्जही मागे घेतल्याने बँक बचावचे नेते एकाकी पडले. अखेर या सर्वांनीच आपले अर्ज मागे घेतले.
चार जागा बिनविरोध
अर्बन बँकेच्या निवडणुकीत चार जागा बिनविरोध निवडल्या गेल्या असून, या चारही जागा सहकार पॅनेलच्या आहेत. मनपा-भिंगार कॅण्टोन्मेंट मतदार संघ-महिला राखीव जागेवर संगीता दीपक गांधी व अनुसूचित जाती-जमाती राखीव जागेवर मनेष साठे. तसेच, राज्य कार्यक्षेत्र मतदारसंघातील महिला राखीव जागेवर मनीषा रवींद्र कोठारी यांची आणि महाराष्ट्राबाहेरील मतदारसंघाच्या एका जागेवर दिनेश कचारिया बिनविरोध निवडले गेले आहेत.
14 जागांसाठी 21 उमेदवार रिंगणात
नगर अर्बन बँकेच्या एकूण 18 जागांपैकी 4 जागा बिनविरोध झाल्याने राहिलेल्या 14 जागांसाठी आता रिंगणात 21 उमेदवार राहिले आहेत. यात मनपा-कॅण्टोन्मेंट मतदारसंघातील 10 जागांसाठी 14जण रिंगणात आहेत. त्यात सहकार पॅनेलचे ईश्वर बोरा, अनिल कोठारी, संपतलाल बोरा, राहुल जामगावकर, राजेंद्रकुमार अग्रवाल, शैलेश मुनोत, गिरीश लाहोटी, दीप्ती गांधी, महेंद्र उर्फ भैया गंधे व अजय बोरा या उमेदवारांव्यतिरिक्त स्मिता पोखरणा, अनिल गट्टाणी, संजय डापसे व दीपक गुंदेचा यांचा समावेश आहे. तर, उर्वरित महाराष्ट्र म्हणजे शाखा मतदारसंघाच्या 4 जागांसाठी सातजण रिंगणात असून, यात सहकार पॅनेलचे कमलेश गांधी (शेवगाव), अशोक कटारिया (पारनेर), अतुल कासट (संगमनेर) व सचिन देसर्डा (नेवासा) या चारजणांसह रमणलाल भंडारी (जैन), गणेश राठी व रजाक इनामदार या अन्य तीन उमेदवारांचा समावेश आहे.


























































