नगर अर्बन निवडणूक बिनविरोधची धाकधूक कायम, अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर अर्बन मल्टिस्टेट शेडय़ुल्ड बँक निवडणुकीत बँक बचाव कृती समितीविरेधात माजी संचालकांच्या सहकार पॅनलने दंड थोपटले आहेत. उमेदवारी अर्ज माघारीसाठी दोन दिवस राहिले असून, ही निवडणूक बिनविरेध व्हावी, यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबत दोन्ही पॅनलमध्ये संमिश्र भावना आहेत. त्यामुळे बिनविरोधची धाकधूक कायम आहे. मात्र, निवडणूक बिनविरोध होणार की नाही हे उद्या (दि. 12) अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. दरम्यान, मनपा व कॅण्टोन्मेंट मतदारसंघातून अक्षय बिहाणी व सुरेश तिवारी या दोन उमेदवारांनी बुधवारी निवडणुकीतून माघार घेतली आहे.

नगर अर्बन बँकेच्या 18 जागांसाठी 28 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत 111 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात अनेकांनी दोन-दोन जागांवर उमेदवारी अर्ज केल्याने प्रत्यक्षात रिंगणात 100 पर्यंत उमेदवार आहेत. शुक्रवारी (दि. 12) माघारीच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाल्यानंतर निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवार संख्याही निश्चित होणार आहे. या पार्श्वभूमीवर माघारीसाठी दोन दिवस राहिले असताना निवडणूक बिनविरोध होऊ शकते का, या दृष्टीने चाचपणी करण्याचे प्रयत्न काही नेत्यांनी सुरू केले आहेत. मात्र, या प्रक्रियेला आता पुरेसा वेळ नसल्याने हे प्रयत्न सफल होतात की असफल याचा फैसला उद्याच होणार आहे.

शब्द फिरविल्यामुळे मनाला वेदना झाल्या – राजेंद्र गांधी

सहकार पॅनेलने मंगळवारी केलेल्या शक्तिप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी सोशल मीडियातून पलटी मारल्यामुळे मनाला वेदना झाल्याची खंत व्यक्त केली. ते म्हणाले, बँकेवर प्रशासक आल्यानंतर सत्य परिस्थिती उघड झाली. दाबून ठेवलेले घोटाळे उघड झाले. घोटाळ्यातील पैसा वसूल होण्यासाठी नियमाप्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल झाले. बँकेची लूट करणाऱया टोळीला परमेश्वराने शिक्षा दिली. याबरोबरच कोटय़वधी रुपयांच्या बोगस कर्जवाटपाची वसुली होणे कठीण झाल्यामुळे एनपीए वाढला. दरम्यान, बँक निवडणुकीला परवानगी मिळाल्यानंतर आपण एकत्र बसून बिनविरोध निवडणूक करू व आपण सर्व मिळून बँक वाचवू, असे गोड बोलण्यात आले. मात्र, गोड बोलणाऱया व्यक्तीने पलटी मारली व स्वतःची जुनी टोळी घेऊन स्वतंत्र पॅनल उभे केले. त्यामुळे मनाला खूप वेदना होत आहेत.

तसे होत असेल तर माझी माघार – वसंत लोढा

अर्ज मागे घेण्यास अजून दोन दिवस बाकी आहेत. जर निवडणूक बिनविरोध होत असेल तर मी स्वतः पुढाकार घेत माझी पत्नी लता लोढा यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यास तयार आहे, असे पंडित दीनदयाळ परिवाराचे प्रमुख वसंत लोढा यांनी सांगितले. ते म्हणाले, नगर अर्बन बँकेच्या झालेल्या बिकट अवस्थेचा विचार करता बँकेच्या भवितव्यासाठी निवडणूक बिनविरोध होणे अत्यावश्यक आहे. यासाठी मी प्रयत्न करत आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या दोन्ही पॅनलच्या प्रमुखांशी, उमेदवारांशी चर्चा केली आहे. जर निवडणूक झाली तर बँकेवर दीड ते दोन कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. बँकेला पुन्हा वैभवाचे दिवस आणायचे असतील तर दोन्ही पॅनलप्रमुखांनी एकत्र येऊन दोन दिवसांत निर्णय घ्यावा, असे आवाहनही लोढा यांनी केले आहे.

बोलणी फिसकटणे दुर्दैवी – अनिल कोठारी

महिन्याभरापासून मी व माझे सहकारी अर्बनची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्नशील होतो. परंतु त्यास यश मिळत नसल्याने निवडणुकीस सामोरे जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही, अशी भावना सहकार पॅनलचे उमेदवार व माजी संचालक अनिल कोठारी यांनी व्यक्त केली. शहरासह जिल्ह्यातील प्रतिष्ठत व्यापारी, राजकीय नेते यांनीही यात सहकार्य दिले. आम्ही त्यांचे आभारी आहोत. बँकेचे माजी चेअरमन ऍडव्होकेट व बँकिंग क्षेत्रातील तज्ञांच्या नावावर आमची सहमती झाली होती. परंतु, काही व्यक्तींचा अतिमहत्त्वकांक्षीपणा आडवा आला व बोलणी फिस्कटली, याचे आम्हास दुःख आहे. आमच्यासाठी बँक व कर्मचाऱयांचे हित सर्वतोपरी असून, त्यासाठी सन्मानजनक व सकारात्मक बोलणीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत, असेही त्यांनी सांगितले.