
विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली आहे. तसेच काँग्रेसवर होणाऱ्या टीकेलाही प्रत्युत्तर देत काँग्रेसमधील गोंधळ दाखवा, असे थेट आव्हान दिले आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत कॉंग्रेसने भाजपचा पराभव केला आहे. आता नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागा आम्ही शिवसेनेला सोडली आहे. नागपूर शिक्षक मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडी जिंकणार, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेसमध्ये कुणाचीही आणि कशाचीही नाराजी नाही. कॉंग्रेसमध्ये गोंधळ सुरू आहे, असे आरोप होत आहे. तो गोंधळ कुठे आहे दाखवा, असे आव्हानच नाना पटोले यांनी दिले आहे. या निवडणुकीत भाजपने शिंदे गटाला एकही जागा दिलेली नाही, हे अपेक्षितच होते. ‘ते’ सत्तेत सोबत असूनही एकत्र नाहीत. हेच यातून दिसून येते, असे ते म्हणाले. आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि पुढे जात आहोत, असेही नाना पटोले म्हणाले.





























































