पाच जणांची हत्या करणाऱ्या पालटकरला ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

नागपुरातील भाजप कार्यकर्ते कमलाकर पवनकर यांच्या कुटुंबातील ४ जणांचा आणि पोटच्या मुलाचा निर्घृणपणे खून करणारा क्रूरकर्मा विवेक पालटकर याला प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ३० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

भाजप कार्यकर्ते कमलाकर पवनकर, पत्नी अर्चना, आई मीराबाई, मुलगी वेदांती आणि भाचा कृष्णा (विवेक पालटकरचा मुलगा) यांचा आरोपी विवेक पालटकरने ११ जूनच्या मध्यरात्री खून केला होता. या हत्याकांडानंतर तो फरार होता. त्याने खोलीवर जाऊन रक्ताने माखलेले कपडे बदलले आणि नंतर ट्रकचालकाला लिफ्ट मागत तो राज्याबाहेर पळून गेला. पोलिसांनी त्याला लुधियाना येथे अटक केली.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने खुनाची कबुली दिली आहे. आराधना नगर येथे ११ जून रोजी पहाटे ३ च्या सुमारास आरोपीने खून केला. शनिवारी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी तपास करण्यासाठी येत्या २ जुलैपर्यंत कोठडीची मागणी केली. न्यायालयाने सर्व बाबी ऐकूण ३० जून पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.