
आयटकच्या नेतृत्वाखालील महिलांच्या मोर्चामुळे नागपुरातील शहीद गोवारी उड्डाणपुलाची वाहतूक बंद करावी लागली. या वर्षीच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या काळात आलेल्या सर्व मोर्चांच्या तुलनेत सर्वात विराट मोर्चा ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक)च्या वतीने काढण्यात आला. दरम्यान, विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱया आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी आज विधान भवनावर 22 मोर्चे धडकले.
राजकीय पक्ष, संघटनांबरोबर आज असंघटित क्षेत्रातील कामगारांनी विशेष करून असंघटित महिला कामगारांनी आयटकच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर धडक दिली. विधान भवनावर धडकण्यासाठी आलेल्या या मोर्चामुळे नागपुरातील शहीद गोवारी उड्डाणपुलाची वाहतूक बंद करावी लागली.
आशा, कंत्राटी आरोग्य, अंगणवाडी कर्मचारी सहभागी
आयटकच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर आलेल्या मोर्चात महाराष्ट्रातील कानाकोपऱयातून असंघटित क्षेत्रातील हजारो महिला सहभागी झाल्या. आशा गटप्रवर्तक, कंत्राटी आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांच्यासह मोठय़ा संख्येने असंघटित क्षेत्रातील महिला कामगार या मोर्चात सहभागी झाल्या. प्रशासनाने गृहित धरलेल्या संख्येपेक्षा या मोर्चामध्ये मोठय़ा संख्येने महिला व मोर्चेकरी सहभागी झाल्या. नागपूर येथील अधिवेशन काळात पहिल्यांदाच शहीद गोवारी उड्डाणपुलावरची वाहतूक बंद करावी लागली.
घरेलू कामगारांना श्रमिकाचा दर्जा द्या!
महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, महाराष्ट्रच्या वतीने नुकताच विधान भवनावर एक हजार महिलांचा मोर्चा काढण्यात आला. घरेलू कामगारांना श्रमिक म्हणून दर्जा मिळावा, सामाजिक सुरक्षा व निवृत्तीवेतनासारखे अधिकार मिळावेत म्हणून धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात 2016 साली फडणवीस सरकारने त्रिपक्षीय घरेलू कामगार कल्याण मंडळ रद्द करून जे शासकीय अधिकारी नियंत्रित एकसदस्यीय मंडळ स्थापन केले आहे ते रद्द करावे व पुन्हा त्रिपक्षीय मंडळ स्थापन करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मंडळाच्या कल्याणकारी योजना जाहीर कराव्यात या मागण्या आंदोलकांनी केल्या. राष्ट्रीय घर कामगार चळवळीचे ज्ञानेश पाटील, राजू वंजारे, सुजाता भोंगाडे यांच्यासह शिष्टमंडळाने कामगार मंत्री सुरेश खाडे यांना समितीचे निवेदन सादर केले.





























































