नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामासाठी अवैध मुरूम उत्खनन, जीआर इन्फ्रासह शेतकऱ्याला तब्बल 294 कोटींचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सोलापूर जिल्हय़ात नागपूर-रत्नागिरी या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू असून, यासाठी बेकायदेशीररीत्या मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी जी. आर. इफ्रा प्रा.लि. कंपनीसह एका शेतकऱ्याला सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांनी तब्बल 294 कोटी 42 लाख 35 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. येत्या सात दिवसांत ही रक्कम न भरल्यास दोघांवरही कारवाई होणार आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी दंडात्मक कारवाई आहे.

सोलापूर जिल्ह्यातून सध्या रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे. हा राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर व सोलापूर जिल्हय़ांतून जातो. या महामार्गाचे काम जी. आर. इफ्रा प्रा. लि. कंपनी करीत आहे. या महामार्गासाठी सांगोला तालुक्यातील शिवणे येथे राहणाऱ्या एका शेतकऱ्याला हाताशी धरून कंपनीने बेकायदेशीररीत्या 2 लाख 77 हजार 758 ब्रास इतक्या मोठय़ा प्रमाणात मुरूम उचलला आहे. या बेकायदेशीर मुरूम उपसाची तक्रार दादा चव्हाण यांनी सांगोल्याचे तहसीलदार अभिजित पाटील यांच्याकडे केली होती. या घटनेची चौकशी करून शिवणे येथील गावकामगार तलाठी हरीश जाधव यांनी अहवाल सादर केला होता. या अहवालामध्ये गौण खनिज उत्खननाकरिता जिल्हाधिकारी व सांगोल्याचे तहसीलदार यांची पूर्वपरवानगी न घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

शिवणे येथील जमीन गट क्रमांक 280, 284, 286, 287, 290, 291, 29/2 289 मधून मुरूम उचलण्यात आला आहे. या घटनेची दखल घेत तहसीलदार अभिजित पाटील यांनी जी. आर. इफ्रा प्रा.लि. कंपनी व संबंधित शेतकऱ्याला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे जुने कलम 48 (7) नुसार 294 कोटी 42 लाख 35 हजार 350 रुपयांची दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.