
हल्लीच्या काळात डेटा लीक होण्याचे प्रमाण वाढले आहे. आधारकार्ड-पॅनकार्डची माहिती बाहेर जाते. त्यामुळे डेटा लीक झाला तर त्यावर तक्रार करण्याची काही यंत्रणा केंद्राच्या मदतीने तयार होणार आहे का, अशी विचारणा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व आमदार आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
ऑनलाईन फसवणुकीच्या संदर्भातील एका प्रश्नावरील चर्चेत भाग घेताना आदित्य ठाकरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. हा विषय ऑनलाईन हॅकिंग, पेमेंट, गेटवे याबद्दल आहे. त्यात अनेकदा ‘ओटीपी’ किंवा ‘केवायसी’ असतो ते करत असताना आपल्या पॅनकार्ड- आधारकार्डची माहिती द्यावी लागते. मध्यंतरीच्या काळात 80 कोटी आधारकार्डची माहिती लीक झाल्याची बातमी आली होती. अनेकदा असे होते की तुम्ही फूड डिलिव्हरीचे अॅप डाऊनलोड करता तेव्हा डेटा लीक होतो आणि सर्व माहिती बाहेर जाते. यासंदर्भात आपण केंद्र सरकारबरोबर अशा यंत्रणेवर काही काम करीत आहोत का? म्हणजे जर आधारकार्ड-पॅनकार्डचा डेटा लीक झाला तर तक्रार करण्याची काही सोय असेल आणि त्याच्यावर आपल्याला कारवाई करता येईल, अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली.
त्यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने डेटा प्रोटेक्शनच्या संदर्भात एक विधेयक केले आहे आणि आता नवीन विधेयकही येत आहे. डेटा लीक होऊ नये म्हणून कसा प्रतिबंध घातला पाहिजे आणि समजा डेटा लीक झालाच तर त्यात आपण काय केले पाहिजे यासाठी सर्व यंत्रणा त्यात तयार केली आहे.
आधारकार्ड पडताळणीची मोहीम
आता आधारकार्डच्या पडताळणीची मोहीम केंद्र सरकारने सुरू केली आहे. कारण जेव्हा आधारकार्डची पहिली मोहीम घेतली त्यावेळी लोकांना फार काही न विचारता आधारकार्ड काढली आहेत. त्यामुळे यामध्ये 8 ते 10 टक्के लोकांनी बनावट आधारकार्ड केली असण्याची शक्यता आहे. अर्थात बनावट आधारकार्ड करणे कठीण आहे. तरीही कधी तरी मशीन ऑफलाईन ठेवून काही करण्याचा प्रयत्न केला असेल, पण त्याची आता पूर्ण पडताळणी नव्याने सुरू झालेली आहे. अशा प्रकारची मोहीम राज्यातही सुरू करता येईल का हे पडताळून पाहिले जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
50 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त
अमली पदार्थांच्या विरोधात सरकारने व्यापक मोहीम सुरू केली असून आतापर्यंत केलेल्या कारवाईत एकूण सुमारे 50 हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. नाशिक रोड येथील एका कारखान्यात मुंबई पोलिसांनी एमडी ड्रग्ज हस्तगत केल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी प्रश्न विचारला होता. यावेळी चर्चेत भाग घेताना काँग्रेसचे अस्लम शेख म्हणाले की उडता पंजाबप्रमाणे आता उडता मुंबई होत आहे. अमली पदार्थांच्या तस्करीत असलेल्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करा. त्यांची बँक खाती, मालमत्ता व घर जप्त करा अशी मागणी त्यांनी केली.
कोस्टल रोड टोलमुक्त करा
मुंबईतील कोस्टल रोडवर टोल लावण्यात येणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. कोस्टल रोडवर टोल लावण्याबाबत महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱयांची नुकतीच एक बैठक झाली. त्यामध्ये याबाबत चर्चा झाल्याचे सदरहू वृत्तात म्हटले आहे. कोस्टल रोड हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यामुळे टोलमुक्त व सिग्नलमुक्त करावा, अशी मागणी शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.
डहाणूमधील आदिवासींच्या निष्कासनाची चौकशी करा
बडोदा द्रुतगती महामार्गासाठी डहाणू तालुक्यातील धानिवरी ईभाड पाडा येथील आठ आदिवासी कुटुंबाला मोबदला न देताच महसूल विभागाने पोलिसांच्या मदतीने त्यांना घरातून जबरदस्ती बाहेर काढले. संतापाची बाब म्हणजे महिलांना विवस्त्र करून बाहेर काढले गेले. त्यानंतर त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवला गेला. राज्य महिला आयोग व मानवाधिकार आयोगानेही या घटनेची दखल घेतली होती. शासनाने त्यानंतर चौकशीसाठी समिती नेमली होती; परंतु सहा महिन्यांनंतरही समितीचा अहवाल आलेला नाही. तो अहवाल तातडीने मागवून घ्यावा आणि या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली.





























































