
शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने परेलच्या टाटा मिल चाळीच्या मैदानात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत नायगावचा श्रीजा इलेव्हन संघ विजेता ठरला असून गिरगावाचा ओंकार इलेव्हन उपविजेता ठरला. विजयी संघाला रोख 25 हजार रुपये आणि सचिन अहिर चषकाने गौरविण्यात आले. उपविजयी संघाला रोख 15 हजार रुपये आणि चषकाने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या विद्यमाने भव्य मर्यादित षटकांची क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. संघटनेचे सरचिटणीस गोविंद मोहिते यांच्या पुढाकाराने तसेच उपाध्यक्ष क्रीडा प्रमुख सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, सचिव दीपक राणे यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा पार पडली. शनिवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत एकूण 16 संघांनी भाग घेतला. स्पर्धेसाठी चार षटकांची मर्यादा घालण्यात आली होती.
विजेत्या श्रीजा इलेव्हन आणि उपविजेत्या ओंकार इलेव्हनमध्ये एकतर्फी लढत झाली. दोन्ही संघांना वेळेची मर्यादा लक्षात घेऊन प्रत्येकी दोन षटके खेळण्याची संधी देण्यात आली होती. विजेत्या श्रीजा इलेव्हाने दोन षटकांत 10 धावा जमविल्या, पण ओंकार इलेव्हनचा विजेत्या संघाच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणापुढे निभाव लागला नाही. अखेर ओंकार इलेव्हनला दोन षटकांत जेमतेम एकच धाव जमवून पराजयाची नामुष्की टाळता आली नाही.
विजेत्या संघाचा प्रसाद लाड याची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड होऊन त्याचा चषकाने गुणगौरव करण्यात आला. संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष सुनील बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे, राष्ट्रीय मजदूर सहकारी ग्राहक संघाचे महाव्यवस्थापक विलास डांगे, सचिव दीपक राणे, सचिव प्रकाश भोसले यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण पार पडले.





























































