
मुंबईचे आद्य शिल्पकार, थोर समाजसुधारक, हिंदुस्थानी रेल्वेचे जनक नामदार नाना शंकरशेट यांच्या धडय़ाचा इतिहासाच्या पुस्तकात समावेश व्हावा यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
नाना शंकरशेट यांच्या 220 व्या जयंतीचे औचित्य साधून दैवज्ञ समाजोन्नती परिषद व गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे तसेच फिटनेस व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा तब्बल 450 हून अधिक दैवज्ञ बांधवांनी लाभ घेतला. डॉ. राहुल राणे व डॉ. अर्चना राणे यांनी हाडांची मजबुती तसेच डॉ. संजय रत्नपारखी यांनी स्ट्रेस मॅनेजमेंट यावर दिलेल्या व्याख्यानाला उपस्थितांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
यावेळी दैवज्ञ समाजश्रेष्ठी सुरेंद्रभाऊ शंकरशेट, दिनकर बायकेरीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. समाजश्रेष्ठी उदयराव गडकरी, उपाध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे सरचिटणीस व दैसप उपाध्यक्ष अॅड. मनमोहन चोणकर, उपाध्यक्ष सूर्यकांत कल्याणकर, विश्वस्त रवींद्र माहीमकर, संजय नाना वेदक, गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनच्या विश्वस्त डॉ. स्मृती रत्नपारखी, जयश्री पेडणेकर, डॉ. राम चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
नवदुर्गांचा सत्कार
विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱया नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला. डॉ. नंदिता पालशेतकर, आसावरी पेडणेकर, अभिनेत्री शीतल क्षीरसागर, राधिका पोतदार, सलोनी कुष्टे, कृष्णा वाळके, सीमा ओवळेकर, गीतांजली पेडणेकर, मैत्रेयी सातघरे या नवदुर्गांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दैवज्ञ समाजोन्नती परिषदेच्या कार्यकारिणी सदस्य व गुणवंतांचा गुरुकृपा हार्ट फाऊंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला.
सरकारदरबारी पाठपुरावा
दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांनी नानांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती देणारा धडा इतिहासाच्या पुस्तकात असावा, नाना शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल टर्मिनसला द्यावे व वडाळा येथील स्मृतीस्थळावर नानांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी सरकारकडून 25 कोटींचा निधी मिळावा यासाठी दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचा व नाना शंकरशेट प्रतिष्ठानचा पाठपुरावा सुरू आहे. सरकारने यासाठी तातडीने पावले उचलावीत असे आवाहन केले. याला प्रतिसाद देतानाच केसरकर यांनी या तिन्ही रास्त मागण्यांसाठी मंत्रालयात दैसप प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व अधिकाऱयांची तातडीची बैठक लावण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या गळय़ात मावळते अध्यक्ष दिनकर बायकेरीकर यांनी सुवर्णपदक घालून त्यांच्याकडे अध्यक्षपदाची व समाजश्रेष्ठी पदाची सूत्रे सोपवली.





























































