
सामना प्रतिनिधी, मुंबई
कोकणात नाणार रिफायनरीचा प्रकल्प होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कारण या प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणाचे काम गेल्या आठ महीन्यांपासून बंद आहे. जमीन अधिग्रहितच होणार नाही, अशी माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली.
हुस्नबानो खलिफे यांनी याबाबतची सूचना मांडली होती. नाणारमधील जनतेला नाणारचा हा प्रकल्प नको आहे. तरीही त्यांच्यावर हा प्रकल्प लादला जात आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी नाणारमधील काही लोकं आझाद मैदानात गेल्या काही दिवसांपासून आझाद मैदानात ठाण मांडून आहेत. त्यामुळे या प्रकल्पाबद्दल शासनाची नेमकी भूमिका काय, असा सवाल त्यांनी केला.
उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी जनतेवर हा प्रकल्प लादला जाणार नाही असे सांगितले. सरकारची समिती येथील लोकांशी चर्चा करत असल्याचे सांगितले. यात हस्तक्षेप करत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी हा प्रकल्पच होणार नसल्याचे सांगितले.































































