
नांदेडचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सल्लागार सचिव श्रीकर परदेशी यांनी २०१० साली नांदेड जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षेत राबविलेले कॉपीमुक्त अभियान आता सबंध राज्यभर राबविले जाणार असून, त्यादृष्टीने नांदेड जिल्ह्यातही ते प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे.
इ.स.२००९-१० या काळात नांदेडचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राहिलेल्या श्रीकर परदेशी यांनी पहिल्या वर्षी आढावा घेवून नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कॉपी प्रकरणाची दखल घेवून इ.स.२०१० साली जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविले होते. या अभियानातंर्गत दहावी आणि बारावीच्या परिक्षा केंद्र प्रवेशावेळी झडती घेणे, यात पोलीस पाटील, कोतवाल, शाळेच्या कर्मचार्यांकडून मुलांची तपासणी तर मुलींची तपासणी ही अंगणवाडी सेविका, मदतनीस व शाळेच्या महिला कर्मचार्यांकडून करवून घेतली. यातंर्गत महसूल विभागाचे पूर्णवेळ बैठे पथक, १ हजार ५० अधिकारी कर्तव्यावर ठेवणे, संवेदनशिल परीक्षा केंद्रावर वरिष्ठ महसूल अधिकार्यांची नियुक्ती करणे, भरारी पथकामार्फत पोलीस, महसूल प्रशासन व जिल्हा परिषदेच्या अधिकार्यांची नियुक्ती करणे तसेच काही विशेष पथकाव्दारे अचानक तपासणी करणे आदी या मोहिमेचा भाग होता. तसेच इंग्रजी, गणित आणि विज्ञान पेपरसाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आकस्मिक भेटीही झाल्या. हे अभियान राबविल्यानंतर २००८ साली ज्या दहावीच्या परिक्षेचा निकाल ८७ टक्के, २००९ साली ९० टक्के लागला. तो मार्च २०१० मध्ये ३१ टक्क्यावर आला. तर २००८ साली बारावीचा निकाल ९२ टक्के, २००९ साली ८२ टक्के लागला. तो २०१० साली २५ टक्क्यावर आला. तर ऑक्टोबरच्या पुरवणी परिक्षेचा निकाल २४ टक्क्यांवरुन ७ टक्क्यावर घसरला. ज्या अतिसंवेदनशिल केंद्रावर पाळत ठेवण्यात आली तेथील निकाल ५० टक्क्यापेक्षा खाली घसरला. २०११ साली हाच निकाल ४१ टक्क्यावर घसरला. त्यानंतर या मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्यानंतर पुन्हा मार्च २०१३ मध्ये दहावीचा निकाल ७४ टक्के तर बारावीचा निकाल ९० टक्क्यावर पोहंचला. २०१५ मध्ये दहावीचा निकाल ८१ टक्के तर बारावीचा निकाल ९१ टक्के तर २०१६ मध्ये दहावीचा निकाल ७४ टक्के तर बारावीचा निकाल ८५ टक्क्यांपर्यंत पोहंचला. दिल्लीमध्ये गेली पाच वर्ष पंतप्रधानांचे शैक्षणिक सल्लागार म्हणून परदेशी यांनी काम केल्यानंतर ते गेल्याच वर्षी राज्यात परतले. त्यांनी गेल्या तीन वर्षातील निकालाचा अभ्यास केल्यानंतर राज्य शासनाला कॉपीमुक्तीचा पॅटर्न सबंध राज्यात लागू करण्याची सूचना केली. त्यानुसार यावर्षीच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा केंद्रावर कॉपीमुक्तीचा पॅटर्न प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे आदेश राज्य शासनाचे अव्वल सचिव विजय भोसले यांच्या स्वाक्षरीनिशी काढण्यात आले आहेत. त्यानुसार कॉपीमुक्तीचा हा पॅटर्न आता राज्यभर लागू होणार असून, त्यासाठी गावपातळीवर जनजागृती, भरारी पथके, विद्यार्थ्यांची झडती व संवेदनशिल तसेच वादग्रस्त केंद्रावर अचानक वरिष्ठ अधिकार्यांच्या भेटी असा कार्यक्रम आखण्यात आला आहे. गेल्या तीन वर्षात निकालाचे प्रमाण अधिकचे येऊ लागल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ लागल्याने गुणवंत विद्यार्थ्यांवर त्याचा परिणाम होऊ लागला. या सर्व परिस्थितीचा अभ्यास घेवून कॉपीमुक्तीचा २०१० चा नांदेड पॅटर्न आता राज्यभर राबविला जाणार आहे. याअंतर्गत परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या काळात १९७३ च्या कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच परीक्षा केंद्राच्या ५० मीटर आत अनाधिकृत व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. परीक्षा केंद्राच्या सभोवताली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. प्रामुख्याने इंग्रजी, गणित आणि विज्ञान पेपरसाठी विशेष काळजी घेवून नजर ठेवली जाणार आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सामनाशी बोलताना सांगितले की, तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी नांदेड जिल्ह्यात २०१० साली राबविलेला कॉपीमुक्ती अभियानाचा पॅटर्न आता राज्यभर राबविला जाणार असून, नांदेड जिल्ह्यात त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले. बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या परिक्षा २ मार्चपासून सुरु होणार आहेत. जिल्ह्यात बारावीसाठी ९२ केंद्रे तर दहावीसाठी १६० केंद्रे आहेत.




























































