नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, पिके धोक्यात; वीज पडून तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नांदेड जिल्ह्यात रविवारी सायंकाळी सायंकाळी उमरी, हिमायतनगर, भोकर, किनवट या तालुक्यात सायंकाळी 4 ते 5.30 वाजेपर्यंत वादळी वार्‍यासह पाऊस व गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गारपीटीत मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा (चोर) येथील बावीस वर्षाच्या व्यक्तीचा वीज पडुन मृत्यु झाला आहे.

नांदेड जिल्ह्यात आज सायंकाळी 4 ते 4.30 वाजेपर्यंत अचानक आकाशात ढग भरून आले आणि वादळी वार्‍यासह पाऊस व गारपीट झाली. जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील कळगाव, इश्वर तांडा, सोमठाणा, हिमायतनगर तालुक्यातील काही गावे, भोकर तालुक्यातील हडोळी, कामनगाव, थेरबन, किनवट तालुक्यात धामनदरी या गावात वादळी वार्‍यासह गारपीट झाली. या गारपीटीमुळे हरबरा, तुर, करडी आदी पिकांचे नुकसान झाले. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडुन प्राप्त झालेल्या माहिती नुसार मुदखेड तालुक्यातील पिंपळकौठा (चोर) येथील दत्ता दिगंबर वाघमारे (22) या युवकाचा शेत शिवारात वीज पडुन मृत्यु झाला. शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले असून अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी पुर्ता खचला आहे. खरीपा पाठोपाठ रब्बीचे ही नुकसान झाले तसेच आंब्याला आलेला मोहर गळुन पडला आहे.

उमरखेड तालुक्यालाही फटका

उमरखेड तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावत शेती पिकाचे नुकसान केले तर कोपरा, जेवली, सावळेश्वर परिसरात गारपीट झाल्याने शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान आज 11 फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान झाले. शेतकर्‍यांचा हरभरा, गहू यासह विविध पिके आज झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने धोक्यात आली आहेत. अवकाळी पावसामुळे यावर्षी सुरुवातीलाच काही शेतकर्‍यांनी हरभरा मोडून नव्याने पेरला व त्यात आज भर म्हणून अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतकर्‍यांचे स्वप्न धुळीस लावले आहे. गहू, हरभरा आल्यानंतर तरी सुख समाधानाने जीवन जगता येईल अशी भोळी भाबडी आशा लावून शेतकरी बसला होता पण आज तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपिट झाल्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर नुकसानीचे पंचनामे होऊन शासनाकडून मदत मिळावी अशी शेतकरी अपेक्षा बाळगून आहेत.