
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या दरम्यान राज्यसभेच्या सभागृहातील प्रश्नोत्तरांच्या तासाला विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांचा उडालेल्या गोंधळाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टिका केली आहे.
राज्यसभेत खासदार कार्तिकेय शर्मा यांनी इंग्रजीत विचारलेला प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कळलाच नाही. तेव्हा नारायण राणे यांनी प्रश्न पुन्हा एकदा विचारण्याची विनंती केली. राज्यसभेच्या उपसभापतींनी शर्मा यांना प्रश्न पुन्हा विचारण्याची विनंती केली. यानंतर त्यांनी प्रश्न समजल्याच्या आविर्भावात बोलण्यास सुरुवात केली. थोडक्यात उत्तर द्या असं उपसभापतींनी सांगितलं पण ते लिहून आणलेलीच वाक्ये वाचून दाखवू लागले. मग विरोधकांनी हे प्रश्नाचे उत्तर नाही, प्रश्न वेगळा आहे असं म्हणत योग्य उत्तराची मागणी केली.
सभागृहात गोंधळ वाढू लागल्यानंतर उपसभापतींनी मध्यस्थी करत नारायण राणे यांना प्रश्न समजवून सांगण्याचा दोन वेळा प्रयत्न केला. मात्र यानंतर देखील नारायण राणे यांनी सांगितलं की जे मी वाचून दाखवत आहे त्यात उद्योग सुरू झाल्यास कामगारांचे प्रश्न सुटतील कंपनी बंद राहिली तर कामगारांचे भले कसे होणार असा प्रतिप्रश्न विचारून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. आता मात्र राज्यसभेच्या उपसभापतींना राणे यांना प्रश्नच कळत नसल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी स्वत:हून त्यांची बाजू झाकत ‘कामगारांच्या कल्याणासाठी कोणती पावलं उचलणार आहात हे तुम्ही संबंधित राज्यसभा सदस्याला बोलवून स्पष्ट कराल’, असं म्हणत वेळ मारून नेली आणि पुढला प्रश्न घेतला.
मात्र राज्यसभेच्या सभागृहातील कामकाजाचा हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्हिडीओ X वर पोस्ट करत नारायण राणे यांच्यावर टिका केली आहे. आपल्या X पोस्टमध्ये दमानिया यांनी ‘नारायण राणे यांना संसदेत प्रश्न विचारला गेला…. ‘MSME क्षेत्रात कामगार कल्याणासाठी काय पावलं उचलणार’ हा प्रश्न होता. उत्तर काय दिलं ऐका. ज्यांना प्रश्न देखील कळत नाही ते MSME ना काय दिशा व चालना देणार? नुसती दादागिरी चालत नाही राजकारणात …. आणि बॉस चा वर्धास्त (वरदहस्त) फार काळ चालत नाही’, असं म्हणत खरपूस शब्दात समाचार घेतला आहे.
यावर नेटकऱ्यांनी देखील तुफान प्रतिसाद देत प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.



























































