मुद्दा : हा दुजाभाव धोकादायक

>>नरेश घरत<<

शेजारी राष्ट्रातील अल्पसंख्याक हिंदुस्थानात आश्रयासाठी आल्यास त्याला नागरिकत्व देण्याचे प्रावधान हिंदुस्थानी नागरिकत्व कायद्यात आहे. मात्र शेजारील राष्ट्रात बहुसंख्य असलेल्यांनी हिंदुस्थानात घुसखोरी केल्यास त्यांना दंडित करण्याचा आदेश संविधान देते. हिंदुस्थानात आजमितीला असलेली स्थिती अत्यंत उलट आहे. या दोन्ही नियमांची सर्रासपणे पायमल्ली होताना दिसून येत आहे. बांगलादेशी घुसखोरांनी अवैधरीत्या हिंदुस्थानात घुसून संपूर्ण हिंदुस्थानभर आपले जाळे पसरवले आहे. दुर्दैवाने काही स्वार्थी राजकारणीच त्यांना आसरा देत आहेत. एजंटस्च्या माध्यमातून अल्पावधीतच यांना आधारकार्ड, रेशनकार्डसह व्होटिंग कार्ड आणि घरेही मिळतात. हिंदुस्थानात गुन्हेगारी क्षेत्रात बांगलादेशींचा मोठय़ा प्रमाणात शिरकाव झाला असून बांगलादेशी घुसखोर आज गृह खात्याची मोठी डोकेदुखी बनली आहे. म्यानमारमधून पलायन करून आलेले हजारो रोहिंगे मुसलमान आज जम्मू परिसरात अवैधरीत्या वसले आहेत. या हिंसक रोहिंग्यांचा पुळका असणारे राजकारणी त्यांना हिंदुस्थानात कायमस्वरूपी बसवण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणत आहेत. कालांतराने यांनाही रेशनकार्ड, आधार कार्ड, व्होटिंग कार्ड मिळतील. केंद्र सरकारही त्यांना पुन्हा पिटाळून लावण्याच्या मनःस्थितीत दिसत नाही. याउलट बांगलादेश आणि पाकिस्तान या देशातून तेथील अत्याचाराला कंटाळून हिंदुस्थानात येऊ पाहणाऱ्या हिंदूंना मात्र दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. कश्मीरात आपल्या राहत्या घरातून पळवून लावलेल्या कश्मिरी पंडितांना आजही दिल्लीतील निर्वासितांच्या छावणीत हलाखीचे जीवन कंठावे लागत आहे. हा दुजाभाव नेमके काय दर्शवतो? गोवा येथे अलीकडेच झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने हिंदूंना हिंदुस्थानात मिळणाऱ्या सापत्न वागणुकीविषयी विचारमंथन करण्यात आले. त्यामुळे निदान अशा गोष्टी लोकांसमोर उघड तरी झाल्या. ही स्थिती बदलणे आज अत्यंत गरजेचे असून धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली परकीय घुसखोरांना हिंदुस्थानात असेच मोकळे रान मिळत राहिले तर भविष्यात देशाची अंतर्गत सुरक्षा व्यवस्था धोक्यात येण्यास वेळ लागणार नाही.