नाशिक जिल्हा रुग्णालयात मृतदेहातील अळय़ाप्रकरणी अहवाल मागविला

नाशिक जिल्हा रुग्णालयात बेवारस मृतदेहांमध्ये अळ्या आढळल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांनी महापालिका व पोलीस यंत्रणेला पत्रव्यवहार केला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा लेखी अहवाल आरोग्य उपसंचालकांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून मागविला आहे.

जिल्हा रुग्णालयात बेवारस मृतदेह कुजल्याचे प्रकार वारंवार होत आहेत. 24 जून रोजी शीतगृहातील एका मृतदेहात अळ्या आढळल्याने संताप व्यक्त होत आहे. पोलिसांमार्फत महापालिकेकडून बेवारस मृतदेहांची विल्हेवाट वेळेवर होत नसल्याने असे प्रकार घडतात, असा खुलासा करीत जिल्हा शल्य चिकित्सक चारुदत्त शिंदे यांनी जबाबदारी झटकली. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी जाग आल्याचा भास निर्माण करून दखल घेण्यास सुरुवात केली आहे. निर्धारित कालावधीत मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची कार्यवाही करावी, असे त्यांनी पालिका व पोलीस यंत्रणेला कळविल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य उपसंचालक कपिल आहेर यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडून उद्या मंगळवारपर्यंत लेखी अहवाल मागविला आहे.