
आडगावच्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नुकतीच दोन रुग्णांवर यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. त्यात एका 62 वर्षीय आजीने आपल्या 22 वर्षीय नातवाला किडनी देत जीवनदान दिले.
यापूर्वी या रुग्णालयात दोन वेळा अशा शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. या नव्याने पार पडलेल्या दोन्हीही जटील शस्त्रक्रियांमध्ये एक वृद्धा व एका तरुणावर अत्यंत बिकट परिस्थितीत यशस्वी उपचार करण्यात आले. नुकतेच त्यांना सुरक्षितरित्या घरी पाठवण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. वैद्यकीय जगतात किडनी प्रत्यारोपण ही अत्यंत गुंतागुंतीची, उच्च काwशल्याची प्रक्रिया मानली जाते.
मानवी शरीरात रक्ताचे शुद्धीकरण, विषारी घटक बाहेर काढणे आणि द्रवपदार्थाचा समतोल राखण्याचे काम किडनी म्हणजेच मूत्रपिंड करत असते. ते निकामी झाल्यास रुग्णाला वारंवार डायलिसिसला सामोरे जावे लागते. प्रत्यारोपण हाच त्यावरील कायमस्वरूपी व प्रभावी वैद्यकीय पर्याय आहे. मविप्र रुग्णालयात आता ही सुविधा अद्ययावत स्वरुपात उपलब्ध झाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला असून, मुंबई-पुणे सारख्या मोठय़ा शहरांकडे धाव घेण्याची गरज नाही.
सर्जरी विभाग प्रमुख डॉ. पैलास मोगल, मेडिसिन विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र कोडीलकर, उपवैद्यकीय अधीक्षक मंगेश जाधव, तसेच अवयवदान समन्वयक डॉ. संजय रकिबे यांच्या समन्वयातून हे उपचार करण्यात येतात. प्रशिक्षित डॉक्टर्स, कर्मचारी वर्गाची अहोरात्र मेहनत आणि अचूक निदानामुळेच या कठीण शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती अधिष्ठाता सुधीर भामरे यांनी दिली.
या कामगिरीबद्दल मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर लोखंडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले आहे.



























































