पुनरावृत्ती होणार नाही यासाठी उपाययोजना करणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी उपाययोजना करण्यात येतील. सात सदस्यीय उच्चस्तरीय समिती या घटनेची चौकशी करणार असून त्यांच्या अहवालानुसार संबंधित दोषींवर कारवाई केली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

नाशिक येथील हुसेन रुग्णालयात बुधवारी दुपारी लिक्विड ऑक्सिजन टँकच्या गळतीमुळे मोठी दुर्घटना घडली. या रुग्णालयाला सायंकाळी राजेश टोपे यांनी भेट दिली. महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडून माहिती घेतली. दुर्घटना झालेल्या लिक्विड ऑक्सिजन टँकचीही पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, या रुग्णालयात लिक्विड टँक आहे. हे गळतीचे घडणारे प्रकार लक्षात घेता राज्यात इतर ठिकाणी टँक उभारताना या दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार नाही ही काळजी घेऊ सीसीटीव्ही बसवणे, कायमस्वरूपी सुरक्षारक्षक नेमणे, देखभाल, दुरुस्तीची काळजी घेत वारंवार देखभालीच्या उपाययोजना केल्या जातील. या घटनेची सात सदस्यीय समितीकडून चौकशी होईल. त्या अहवालानुसार संबंधित दोषींवर कारवाई होईल. समिती ज्या सूचना करेल, उपाययोजना सांगेल त्याचा विचार करून कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले.