महिलांच्या कपड्यात डोकावण्यापेक्षा लोकांच्या वेदना पाहा; राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीचा प्रचाराला वेग येत आहे, तसेच विविध पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपही वाढत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांच्या कपड्यांबाबत वक्तव्य केले होते. त्या वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल केला असून मुख्यमंत्री नेहमी महिलांच्या कपड्यांकडेच का बघतात, त्यांनी महिलांच्या कपड्यात डोकावण्यापेक्षा जनतेच्या वेदना समून घ्याव्यात, असे राबडीदेवी यांनी म्हटले आहे.

पूर्वी कोणी कसेही कपडे घालायचे, आता बघा लोकं किती छान दिसतात. चुकून जरी या अयोग्य मत दिले, तर तुम्ही बरबाद व्हाल, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकतेच एका निवडणूक रॅलीत महिलांकडे बोट दाखवत म्हटले होते. त्यावर मुख्यमंत्री नितीश कुमार हे महिलांच्या कपड्यांकडे बघत राहतात, त्यांना महिलांच्या कपड्यांबाबत एवढे कुतूहल का, असा संतप्त सवाल माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी केला आहे.

राबडीदेवी म्हणाल्या की, नितीश कुमार यांनी महिलांच्या कपड्यात डोकावण्यापेक्षा बिहारच्या लोकांचे दुःख, त्रास आणि वेदना समस्या पाहिल्या असत्या, तर बरे झाले असते. नितीश कुमार महिलांचा अपमान करत आहेत. ते जबाबदारीच्या आणि महत्त्वाच्या पदावर आहात याचे त्यांनी भान ठेवावे, असेही राबडीदेवी म्हणाल्या आहेत. मुख्यमंत्री, सर्व कामे सोडून महिला काय करतात यावर लक्ष ठेवतात. त्यांना महिलांच्या कपड्यांमध्ये एवढे कुतूहल का आहे, असा सवाल त्यांनी केला. राजकीय विरोध करायचा असेल, तर योग्य तिथे विरोध करा. महिलांच्या अस्मितेला धक्का लावू नका, असेही राबडीदेवी यांनी म्हटले आहे.