
गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रात गुंडाराज पाहायला मिळत आहे. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला गुंड येत आहेत. महाराष्ट्रात मोकाट गुंडांचे थैमान सुरू असून कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाले आहेत. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारत त्यांचा राजीनामा मागितला आहे.
”गृहमंत्री राजीनामा द्या. राज्याचे गृहमंत्री छातीठोकपणे सुशासनाच्या गप्पा मारतायंत, पण राज्यात गेल्या आठवडाभरात कायदा, सुव्यवस्था आणि सुशासन याची पुरती वाट लागली आहे. छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणं सोपं आहे. ‘आदर्श महनीय, पण स्वत:ची कृती निंदनीय’ असणार्यांनी भाषणबाजीवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा राज्याकडे बारकाईने पाहावं. संपूर्ण राज्यात राजकीय गुंडगिरी सुरू आहे, गृहमंत्री यावरही काही बोलाल का?, असा सवाल राष्ट्रवादीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.


























































