
मान्सूनने दडी मारल्यामुळे सर्वच जण चिंतेत असताना चोरट्यांनी मात्र कर्जतकरांच्या तोंडचे पाणीच पळवले आहे. अज्ञात चोरट्यांनी हद्द केली असून चिल्लार नदीवरील बंधाऱ्याच्या २५ लोखंडी प्लेट पळवल्या आहेत. कर्जत तालुक्यातील मोग्रज ग्रामपंचायत हद्दीतील आंबिवली गावाजवळ हा प्रकार घडला असून बंधाऱ्याला प्लेट नसतील तर पाऊस सुरू झाल्यानंतर बंधाऱ्यात पाणीच थांबणार नाही. परिणामी आंबिवली परिसरातील गावांचा शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.
आंबिवली व शिंगढोळ गावांच्या मध्यभागी असलेल्या बंधाऱ्याची सध्या दुरुस्ती सुरू आहे. दुरुस्तीच्या कामादरम्यान ठेकेदाराने बंधाऱ्यावरील लोखंडी प्लेट काढून सुरक्षितपणे बाजूला ठेवण्यात आल्या होत्या. मात्र काही दिवसांपूर्वी रात्री अज्ञात चोरट्यांनी २५ प्लेट लंपास केल्या. प्लेट चोरीला गेल्याचे समजताच कशेळे ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल झाली आहे. सरकारी मालमत्तेची चोरी झाल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.
भंगार चोर की अन्य कुणी?
चोरीला गेलेल्या प्रत्येक प्लेटचे वजन ५० ते ६० किलो आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोखंडी साहित्य चोरीला गेल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे. भंगार चोरांची टोळी किंवा बंधारा दुरुस्तीच्या कामाशी संबंधित कुणी या चोरीमध्ये सहभागी आहे का? यादृष्टीने कशेळे पोलीस तपास करत आहेत.
पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार
लोखंडी प्लेट केवळ बंधाऱ्याचा भाग नसून गावाच्या पाणी व्यवस्थेशी थेट संबंधित आहेत. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात नदीतील पाणी कमी झाल्यानंतर या प्लेट बसवून पाणी अडवले जाते. त्यामुळे नदीलगतच्या विहिरींमध्ये पाणीसाठा निर्माण होतो. त्यामुळे शेतीच्या सिंचनाचा तसेच उन्हाळ्यात आंबिवली गावाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा




























































