नवाब मलिक यांचा जामीन अर्ज फेटाळला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात केलेला जामीन अर्ज बुधवारी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. मलिक यांच्याविरोधातील गुह्याचे स्वरूप गंभीर आहे. त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरसोबत कारस्थान रचल्याचे मुख्य साक्षीदार सरदार खानच्या जबाबातून स्पष्ट होते, असे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी मलिक यांना जामीन देण्यास नकार दिला.

सत्र न्यायालयाने मलिक यांच्या जामीन अर्जावर उभय पक्षांचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर 14 नोव्हेंबरला निर्णय राखून ठेवला होता. तो निर्णय बुधवारी जाहीर केला. मलिक यांनी जमीन खरेदी करण्यासाठी मूळ मालक असलेल्या मुनारी प्लम्बरशी संपर्क साधल्याचा पुरावा नाही. ईडीने याप्रकरणी सादर केलेले पुरावे परस्पर वेगळे असले तरी मुनारी प्लम्बरचा जबाब नाकारता अथवा त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्याचबरोबर मलिक यांच्याकडे अजूनही वादग्रस्त मालमत्तांचा ताबा आहे, अशी निरीक्षणे नोंदवत न्यायाधीश रोकडे यांनी जामीन अर्ज फेटाळला.

कथित टेरर कनेक्शन

मलिक यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरशी संगनमत करून आर्थिक अफरातफर केल्याचा आरोप आहे. दाऊदच्या हस्तकाशी संबंधित असलेल्या सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा व्यवहार करणाऱया पंपनीशी मलिक यांचा संबंध असल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानंतर या प्रकरणात ईडीने मलिक यांना 23 फेब्रुवारीला अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.