वानखेडेंनी पालिकेच्या दस्तावेजात खाडाखोड केली, नवाब मलिक यांचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या दस्तावेजात खाडाखोड करून 1993 मध्ये दस्तावेज बदलले आणि रजिस्टर गहाळ केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज केला. यासंदर्भातील मूळ कागदपत्रे आम्ही मुंबई उच्च न्यायालयात सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

समीर वानखेडे यांचा सेंट जोसेफ हायस्कूल आणि सेंट पॉल हायस्कूलचा शाळा सोडल्याचा दाखला नवाब मलिक यांनी समोर आणला आहे. या दोन्ही प्रमाणपत्रांमध्ये ‘समीर दाऊद वानखेडे, धर्म-मुस्लिम’ असे लिहिले आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत समीर वानखेडे यांच्यावर नवीन आरोप केले. मुंबई महापालिकेच्या कागदपत्रात केलेली खाडाखोड, आयपीएस अधिकाऱयाच्या मुलाला कशाप्रकारे ड्रग्ज केसमध्ये अडकवले आणि पहिल्या घटस्पहटित पत्नीच्या चुलत भावाच्या घरात अमली पदार्थ ठेवले असा आरोप या वेळी नवाब मलिक यांनी केला.

समीर वानखेडे यांनी पालिकेचे दस्तावेज बदलले, पण त्यांना हे माहीत नव्हते की, महापालिकेने ते दस्तावेज स्पॅन करून ठेवले आहेत. आज ते महानगरपालिकेचा संगणकीय दाखला दाखवत आहेत असा दावा नवाब मलिक यांनी केला.

महापालिकेचे सर्व रेकॉर्ड आम्ही तपासले. वानखेडे यांना शाळेत दाखल केल्यापासून शाळा सोडल्याच्या दाखल्यापर्यंत सर्व कागदपत्रे आम्ही गोळा केली आहेत. न्यायालयासमोर ही कागदपत्रे ठेवण्यात आली आहेत.

हायकोर्टाने याचिकाकर्त्यांनाही हे कागदपत्रे देण्यास सांगितले आहेत असे ते म्हणाले.