
सामना ऑनलाईन । गडचिरोली
महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीतील भामरागड तालुक्यात तीन जणांना केवळ पोलिसांचे खबरे असल्याच्या संशयावरून मारण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर या भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
भामरागड तालुक्यातील कोसफुंडी फाट्याजवळ आज सकाळी तीन मृतदेह आढळले. हे तीन मृतदेह कसनासूर गावातील ग्रामस्थांचे असल्याची ओळख पटली आहे. या मृतदेहासोबत नक्षलवाद्यांनी एक लाल रंगाचा बॅनर लावला होता. 22 एप्रिल 2018 मध्ये पोलिसांनी येथे एक मोहीम आखून 40 नक्षलवाद्यांना ठार मारलं होतं. त्यावेळी पोलिसांना या तीन ग्रामस्थांनी मदत केली असल्याचा संशय असल्याने या तिघांना ठार करण्यात येत असल्याचे नक्षलवाद्यांनी बॅनरनर लिहून ठेवले होते. तसेच अन्य दोन ग्रामस्थांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केल्याची माहितीही कळते आहे.
दरम्यान, या घटनेनं ताडदेव पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कसनासूर गावात खळबळ उडाली आहे.



























































