एनसीबीचा कारवाईचा धडाका सुरूच, ड्रग्ज प्रकरणात 15 जणांची चौकशी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नार्कोटिक्स पंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबई युनिटने शहरात कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. एनसीबीने गेल्या 24 तासांत मुंबई आणि ठाणे येथे चार केसेस करत सहा जणांना अटक करून काही प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे. तर ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने 15 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यात अल्पवयीन मुलीचा समावेश आहे.

तरुणाईला ड्रग्जच्या विळख्यात ढकलणाऱया तस्करांविरोधात एनसीबीने ऑपरेशन हाती घेतले आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने मुंबई आणि ठाणे येथे कारवाई करून 7 जणांना अटक केली. माहीम येथे कारवाई करून दोघांना एनसीबीने ताब्यात घेतले असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. त्या दोघांकडून एनसीबीने 105 ग्रॅम एमडी जप्त केले आहे. तर ठाण्यात एका सोसायटीत कारवाई करून एमडीएमएच्या टॅब्लेट्स आणि 20 ब्लॉट्स जप्त केले आहे. एनसीबीने तिसरी कारवाई अंधेरी येथे करून एका महिलेसह एकाला ताब्यात घेतले. त्या दोघांकडून एनसीबीने 57 ग्रॅम एमडी जप्त केले.

ड्रग्ज तस्करीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर

ड्रग्जच्या धंद्यात तस्कर हे अल्पवयीन मुलींचा वापर करत असल्याची बाब समोर आली आहे. त्या मुलींना ड्रग्जच्या तस्करीत काही पैसे दिले जातात. ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने चौकशीसाठी 15 जणांना ताब्यात घेतले असून त्यात काही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

ड्रग्ज तस्करांचा केला पाठलाग

एनसीबी, मुंबई युनिटने नवी मुंबई येथे कारवाई करून केनेथ इझी या नायजेरियनला अटक केली. त्याच्याकडून एनसीबीने 200 ग्रॅम एमडी जप्त केले. त्याला पकडण्यासाठी एनसीबीचे पथक खारघर येथे गेले होते. एनसीबीच्या पथकाला पाहताच केनेथ हा पळू लागला. दोन किलोमीटरपर्यंत एनसीबीने त्याचा पाठलाग करून केनेथला ताब्यात घेतले.