माझ्या विधानाचा विपर्यास केला; महाविकास आघाडी टिकून राहावी हाच माझा प्रयत्न, शरद पवारांनी चर्चांना दिला पूर्णविराम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील राजकारण सध्या विविध वळणं घेत आहे. अशातच महाविकास आघाडीच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आलं होतं. मात्र आता खुद्द शरद पवार यांनी आपल्या विधानाचा विपर्यास केल्याचं स्पष्ट केलं आहे.

2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. पण शरद पवार यांनी एक विधान केलं आणि वेगळ्याच चर्चांना सुरुवात झाली. ‘एकत्र लढण्याची इच्छा फक्त पुरेशी नसते..’ असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं त्यामुळे माध्यमांनी थेट महाविकास आघाडीत निवडणूक लढणार की स्व-बळावर अशा चर्चांना सुरुवात केली.

माध्यमांमधील विविध चर्चांनंतर वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी ‘महाविकास आघाडीने 2024मध्ये भाजपचा पराभव करावा ही पवार यांची भूमिका’ असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर शरद पवार यांनी स्वत: या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, ‘माझ्या व्यक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला आहे. महाविकास आघाडीत जागा वाटप निश्चित नाही. महाविकास आघाडी टिकून राहावी हाच माझा प्रयत्न आहे. तर माझ्या व्यक्तव्याचा विपर्यास करण्यात आला’, असंही पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, याआधी महाविकास आघाडीच्या या उभारणीमध्ये शरद पवार यांचा महत्त्वाचा वाटा आहे. शरद पवार यांचं महत्त्व या आघाडीत आहे आणि ते राहणार. तिन्ही पक्ष एकत्र राहिले तर 2024साली आपण भारतीय जनता पक्षाचा पराभव करू आणि लोकसभासुद्धा मोठ्या संख्येने जिंकू ही शरद पवार यांची भूमिका आहे, असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं.