हा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव! अनिल देशमुख यांच्यावरील सीबीआय छाप्याचा राष्ट्रवादीकडून निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयने घातलेल्या धाडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. राजकीय नेत्याच्या बदनामीसाठी धाडी घालण्यात येत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. तर केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करून राज्य सरकारला बदनाम केले जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आज सीबीआयने धाड टाकली. या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी सीबीआयवर राजकीय उद्दिष्टे साध्य करत असल्याचा आरोप करताना धाडीचा निषेध केला.

अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला. तसेच सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. यासंदर्भात एकूण चार जणांची चौकशी झाली आणि चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली असे सांगतानाच जयंत पाटील यांनी उच्च न्यायालयाने केवळ प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते याकडे लक्ष वेधले. प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले आणि याचा अहवाल न्यायालयात मांडण्यात आल्याचे अद्यापपर्यंत ऐकिवात नाही, याकडे जयंत पाटील यांनी लक्ष वेधले.

अॅण्टेलियाजवळ सापडलेली स्पह्टके आणि हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आली. या चौकशीच्या संदर्भात मिळालेल्या परवानगीचा दुरुपयोग सीबीआय करत आहे, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

परमबीर सिंग यांची भूमिका काय?

कायद्यापुढे कुणीही मोठा नाही. अनिल देशमुख यांनी सुरुवातीपासून सीबीआय चौकशीला सहकार्य केले आहे. ही घटना ही अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेल्या बॉम्बची आहे. यामध्ये आजपर्यंत सचिन वाझे कुणाच्या सांगण्यावरून काम करत होता याबाबतचा एनआयएने खुलासा केलेला नाही. याशिवाय यामध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भूमिका काय होती? त्यांच्या पत्रावरून कारवाई होतेय हे राजकारण सुरू आहे, असेही नवाब मलिक म्हणाले.

दया, कुछ तो गडबड है!

सीबीआयला उच्च न्यायालयाने काही आदेश दिले आहेत. सीबीआय त्यानुसार काम करत असेल. यात राजकीय सूडबुद्धीचा प्रकार नसावा असं मी मानतो. पण जर तसं काही असेल, तर महाविकास आघाडीचं सरकार म्हणून आम्ही यासंदर्भात भूमिका घेऊ. अनिल देशमुखांवर धाडी, एफआयआर वैगरे अतिरेक आहे. हा सर्व प्रकार न्याय व तर्कसंगत दिसत नसल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले, ‘दया कुछ तो गडबड जरूर है’ अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.