राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा प्रदेशाध्यक्षांसमोर गोंधळ; युवक उपाध्यक्षांना धक्काबुक्की

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच शाब्दीक चकमक होवून राष्ट्रवादीचे युवकचे उपाध्यक्ष किरण काळे यांना धक्काबुकी झाल्याचा प्रकार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोरच झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला. प्रदेशाध्यक्षांनी तात्काळ या वादावर पडदा टाकला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी नगरमध्ये आले आहेत. त्यांचे स्वागत झाल्यानंतर ते जिल्हाध्यक्षांच्या केबीनकडे निघाले असता राष्ट्रवादीचे निलंबीत नगरसेवक तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांच्यामागे होते.

जयंत पाटील यांनी आत गेल्यावर गर्दी होवू नये,यासाठी दरवाजा बंद करण्यास सांगितले. यामध्ये अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी बाहेरच अडकले होते. त्यामुळे दरवाजा ढकलण्याचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांनील केला. त्यात आरडाओरडा आणि धक्काबुक्की झाली. आतमध्ये असलेले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाळके, आमदार अरुण जगताप या गोंधळाने बाहेर आले. ते येईपर्यंत किरण काळे यांना धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणावर प्रदेशाध्यक्षांनी पडदा टाकला आणि सर्वांना शांत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यावेळी किरण काळे यांनी मला मारता का असा सवाल केला. काही कार्यर्त्यांनी काळे यांचा हा प्रकार स्टंटबाजी असल्याचे सांगत बाहेर निघून गेले. प्रदेशाध्यक्षांसमोरच हा गोंधळ झाल्याने याची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 18 नगरसेवकांना निलंबीत केल्यानंतर नगरसेवक प्रदेशाध्यक्षांना भेटण्यासाठी आले होते. पण प्रदेशाध्यक्षांसमोरच गोंधळ झाल्यामुळे त्यांनी नाराज नगरसेवकांना आतमध्ये बोलावले आणि बंद खोलीत चर्चा केली.