
एमडी, एमएस, पीजी डिप्लोमा अशा वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट-पीजी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. देशातील 849 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा 21 मे रोजी घेण्यात आली. त्यानंतर अवघ्या दहा दिवसांतच निकाल जाहीर करण्यात आला असून त्यासाठी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडविया यांनी राष्ट्रीय परीक्षा मंडळाचे कौतुक केले.
मनसुख मांडविया यांनी ट्विट करून ‘नीट-पीजीसाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. निर्धारित वेळेच्या आधी म्हणजेच विक्रमी दहा दिवसांत निकाल जाहीर करण्याचे काम केले आहे. याबद्दल मी राष्ट्रीय परीक्षा मंडळाचे कौतुक करतो,’ असे म्हटले आहे. नीट-पीजीचा कट ऑफदेखील जाहीर करण्यात आला आहे.
सामान्य/ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी कट ऑफ स्कोअर 800 पैकी 275 आहे, तर एससी/एसटी/ओबीसी/पीडब्ल्यूडीसाठी कट ऑफ 245 आहे. सामान्य श्रेणीतील अनारक्षित आणि पीडब्ल्यूडी श्रेणीतील उमेदवारांसाठी 260 इतका कट ऑफ आहे. उमेदवार 8 जूनपासून अधिकृत वेबसाइट- nbe.edu.in वरून त्यांचे वैयक्तिक स्कोअर कार्ड डाऊनलोड करू शकतात.



























































