
कोरोनाबाधित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील भेंडे येथील शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये बुधवारी दुपारी घडली आहे. गणेश दिनकर करांडे (वय 40, रा. नेवासे खुर्द) असे मृताचे नाव आहे.
भेंडे (ता. नेवासा) येथे संत नागेबाबा भक्तनिवासात शासकीय कोविड केअर सेंटर सुरू असून, तेथे 200 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. या कोविड सेंटरमधील तिसऱया मजल्यावरील कॉन्फरन्स हॉलमध्ये 40 रुग्ण ऍडमिट आहेत. गणेश हा 18 एप्रिल रोजी या कोविड सेंटरमध्ये दाखल झाला होता. त्याची आईसुद्धा येथेच दाखल होती. गणेशची आई व इतर सर्व रुग्ण दुपारी 12 वाजता जेवणासाठी खाली गेले. मात्र, गणेश एकटाच मागे थांबून राहिला. इतर सर्वजण जेवण करून आपापल्या बेडवर परतले. कोणीतरी तासाभरापासून बाथरूममध्ये गेला आहे, तो बाहेरच आला नाही, असे लक्षात येताच, सफाई कामगाराने बाथरूमचा दरवाजा वाजवला; परंतु आतून प्रतिसाद न मिळाल्याने सफाई कामगाराने वैद्यकीय अधिकाऱयांना बोलावून घेतले. त्यानंतर बाथरूमचा दरवाजा तोडला असता, छताला असलेल्या पंख्याला गणेशने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश साळुंके, पोलीस निरीक्षक विजय करे, सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर, उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे हे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेहाचे नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नेवासा खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत गणेश करांडे हा दररोज नेवासा येथून येऊन भेंडा परिसरात दारोदारी फिरून बेकरी उत्पादने विक्रीचा व्यवसाय करीत होता. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.


























































