
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दरररोज विक्रमी वाढ होत आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यात 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारपासून दररोज रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शनिवार-रविवारी म्हणजेच शुक्रवारी संध्याकाळी 8 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे, तर अन्य दिवशी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यानुसार राज्यात प्रार्थना स्थळे, खासगी कार्यालये, मॉल्स, रेस्टॉरंट्स, बार, सलून, ब्युटी पार्लर बंद राहणार आहेत. मात्र हे निर्बंध लावताना अर्थचक्राला कोणताही धक्का न लागता कामगार व श्रमिकांना त्रास होणार नाही यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहणार असल्याचे जाहीर करतानाच सरकारने राज्यभरात ‘मिशन ब्रेक दी चेन’ सुरू केले आहे.
कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा शिरकाव झाल्यानंतर पुन्हा एकदा रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने त्यावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रविवारी तातडीने राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीत राज्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले असून यापुढे ‘मिशन बिगिन अगेन’ ऐवजी ‘मिशन ब्रेक दी चेन’ जारी करण्यात आले आहे.
कोरोना रोखण्यासाठी हे निर्बंध; रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी
राज्यात 144 कलम लागू. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई़ रात्री संचारबंदी तर दिवसा जमावबंदी जारी असून रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.
बागा, चौपाटय़ा, समुद्रकिनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोपं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते.
किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील.
अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱयांचे लवकरात लवकर लसीकरण करावे लागणार.
मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाटय़गृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क, सलून, ब्युटी पार्लर, स्पा पूर्णपणे बंद राहतील.
उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱया अभ्यागतासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहील.
शाळा-महाविद्यालये बंद राहतील. मात्र दहावी व बारावी परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.
…तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट झोन
पाचपेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार, बाहेरच्या लोकांना प्रवेशबंदी.
हे सुरू राहणार
शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.
उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र या ठिकाणी आरोग्याचे नियम पाळावे लागणार.
सर्व बांधकामे सुरू राहणार.
ई-कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱया कर्मचाऱयांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबंधित दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड.
वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल, मात्र विव्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे.
चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण सुरू ठेवता येईल, मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करता येणार नाहीत. सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून अंमलबजावणी होईल.
खासगी कार्यालये बंद, सरकारी कार्यालयांत 50 टक्के उपस्थिती
खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्पेट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज, पाणीपुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील़ सरकारी कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील. सरकारी कार्यालयांत बाहेरील व्यक्तींना प्रवेश नाही. आवश्यक भासल्यास कार्यालय किंवा विभागप्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाइनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱयांना बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल.
सर्व वाहतूक नियमितपणे सुरूच; उभ्याने प्रवास करता येणार नाही
सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील. सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा. बसचालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱया रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवास करता येणार नाही.
दर्शनासाठी प्रार्थना स्थळे बंद
सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थींसाठी बंद राहतील. मात्र या ठिकाणी काम करणारे कर्मचारी, पुजारी यांना दैनंदिन पूजाअर्चा करता येईल. या कर्मचाऱयांचे लसीकरणदेखील लवकर पूर्ण करून घ्यावे.
रस्त्यावरील खाद्यपदार्थ विव्रेत्यांसाठी पार्सल सेवा
रस्त्याच्या कडेला असणाऱया खाद्यपदार्थ विव्रेत्यांना सकाळी 7 ते रात्री 8 केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल, मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करेल.
आजारी कामगाराला काढता येणार नाही
बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा व ठेकेदाराने आरोग्य तपासणी करायची आहे.
सरकारच्या निर्णयाला जनतेने सहकार्य करावे – देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शनिवारी-रविवारी कडक लॉकडाऊन आणि इतर दिवशी कडक निर्बंधाचा निर्णय घेतला आहे. आम्ही जनतेला आवाहन करतो, या संपूर्ण निर्णयाला जनतेने सहकार्य करावं, भाजपच्या कार्यकर्त्यांनीही नियमांचे पालन करावे, असे आवाहन करतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आताची कोरोनाची भयावह परिस्थिती पाहता आमचे सर्व नेते आणि आम्ही सर्व सहकार्य करणार आहोत.
जास्तीत जास्त लोकांना लसीकरण करता येईल या दृष्टीकोनाने भाजपचे कार्यकर्ते सक्रियतेने सहभागी होतील, असे सांगितले. सरकारने केवळ लॉकडाऊन किंवा निर्बंधाची चर्चा करुन चालणार नाही. त्यासोबतच नवीन स्ट्रेन काय आहे? तो इतक्या वेगाने महाराष्ट्रातच का वाढतोय? यासंदर्भात प्रबोधन केलं पाहिजे. लॉकडाऊनमुळे लोकांच्या रोजगारावर गदा येऊ शकते. त्यामुळे सरकारने वीज कनेक्शन कट करण्याचा निर्णय मागे घ्यावा. सरकारने समाजातील गरीब घटकाचा विचार करावा. त्यांच्यासाठी पॅकेज जाहीर करावे अशी मागणीही फडणवीस यांनी केली.
…तर दुकाने उघडण्यास परवानगी देणार
सध्या किराणा, औषधांव्यतिरिक्त कोणत्याही दुकानांना परवानगी नाही. मात्र अन्य दुकानदारांनी आपल्याकडील कर्मचाऱयांना कोरोनाची लस दिल्यास त्याचप्रमाणे दुकानांत ग्राहक आणि विव्रेत्यांमध्ये काच किंवा थेट संपर्क येणार नाही अशी उपाययोजना केल्यास सर्व दुकाने सुरू करण्याबाबत विचार होईल.
मुख्यमंत्र्यांची विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा
राज्यातील लॉकडाऊनसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांसोबतही चर्चा केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पह्न करून त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी फडणवीस यांनी भाजपकडून प्रशासनाला सर्व सहकार्य केले जाईल असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट बंद
खासगी कार्यालये बंद; ‘वर्क फ्रॉम होम’वर भर
सिनेमागृहे, नाटय़गृहांचेही शटर डाऊन
रिक्षा-टॅक्सीत फक्त दोनच प्रवासी
सर्व धार्मिक स्थळे बंद
सलून, ब्युटी पार्लर, व्यायामशाळा बंद
रुग्णसंख्या धडकी भरवणारी
मुंबई 11163
राज्य 57074
गेल्या काही दिवसांत राज्य आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आज दिवसभरात सर्वाधिक 57 हजार 74 रुग्ण सापडले, तर 222 जणांचा मृत्यू झाला. मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला असून 11 हजार 163 रुग्ण सापडले, तर 25 जणांचा मृत्यू झाला. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि पालिका प्रशासन सतर्क झाले असून कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजनांसह बेडच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे.
मुंबईत मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला आहे. महापालिका व आरोग्य विभागाच्या प्रयत्नांमुळे रुग्णसंख्या कमी होत होती, मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली. मुंबईत गेल्या काही दिवसांत पाच हजारांवर असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होऊन शुक्रवारी 8 हजार 832 नवे रुग्ण सापडले. शनिवारी त्यात भर पडून ही रुग्णसंख्या 9090 वर पोहोचली तर आज त्यात दोन हजारांनी वाढ होऊन ही संख्या 11 हजार 163 वर पोहोचली आहे. मुंबईतील बोरिवली, अंधेरी, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर अशा एकूण 8 विभागांत रुग्ण आणि सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. दरम्यान, आज दिवसभरात 51 हजार 319 कोरोना चाचण्या झाल्या तर 28 हजार 15 जणांचे लसीकरण करण्यात आले. मुंबईत एकूण लसीकरण 13 लाख 58 हजार 588 झाले आहे.
मुंबईत गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ
मुंबईत गंभीर रुग्णांच्या संख्येत गेल्या चार दिवसांत 452 रुग्णांची वाढ झाली असून गंभीर रुग्णांची संख्या आता 1055 वर पोहोचली आहे. सध्या मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 4 लाख 52 हजार 445 वर पोहोचली असून त्यापैकी 49 हजार 902 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत, तर 11 हजार 230 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. गंभीर रुग्णांबरोबर सक्रिय रुग्णसंख्येतही झपाटय़ाने वाढ होत आहे. सध्या एकूण 62 हजार 187 सक्रिय रुग्ण आहेत.































































