
सामना प्रतिनिधी, नवी मुंबई
महाघातक कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी वाशी येथील एमजीएम रुग्णालयाने आयोजित केलेल्या वॉकेथॉनला आज जोरदार प्रतिसाद मिळाला. या वॉकेथॉनमध्ये हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. कर्करोगापासून दूर राहण्यासाठी काय काळजी घ्यावी आणि कोणकोणत्या सवयी टाळाव्यात, याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
एमजीएम रुग्णालयाच्या वतीने गेल्या सहा वर्षांपासून वेगवेगळ्या विषयांबाबत जनजागृती करण्यासाठी वॉकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. यंदा या वॉकेथॉनसाठी कॅन्सर हा विषय निवडण्यात आला होता. हजारो नवी मुंबईकरांनी या वॉकेथॉनमध्ये सहभागी होऊन कॅन्सर न होण्यासाठी काय काळजी घ्यायची आणि दुर्दैवाने झाला तर काय उपाय करायचे याची जनजागृती केली. या वॉकेथॉनमध्ये एमजीएम समूहाचे अध्यक्ष कमलकिशोर कदम, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार, एमजीएमचे वैद्यकीय संचालक डॉ. नितीन कदम आणि सुधीर कदम, विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.
वाढत्या तणावामुळे कॅन्सरला निमंत्रण
जग जसे आधुनिक झाले तसे शारीरिक श्रम कमी झाले असून कामाच्या ठिकाणी ताणतणाव मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. आपल्या जीवनशैलीबरोबर खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या आहेत.धूम्रपानाबरोबर याही कारणांमुळे कॅन्सरला निमंत्रण मिळत असल्याने कॅन्सरच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. अशी प्रतिक्रिया एमजीएम रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. नितीन कदम यांनी व्यक्त केली आहे.




























































