पाणीटंचाईच्या भागात नव्या जलवाहिन्या, दिवाळीनंतर काम सुरू होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

दक्षिण मुंबईसह उपनगरातील काही भागांत सध्या पाणीटंचाई निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित विभागात नव्या जलवाहिन्या टाकण्यात येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. दिवाळीनंतर या जलवाहिन्या टाकण्याचे काम करण्यात येईल. यामध्ये नव्या जलवाहिन्या नव्याने टाकणे, काही जलवाहिन्या बदलणे अशी कामे केली जाणार आहेत.

शहर भागातील कुलाबा, कफ परेड, ग्रँट रोड, नाना चौक, डोंगरी, भायखळा तसेच पूर्व उपनगरांतील चेंबूर, गोवंडी, वडाळा, कुर्ला या भागातही पाणीटंचाई जाणवत आहे. कमी दाबाने आणि अपुऱया वेळेत पाणीपुरवठा होत असल्यामुळे स्थानिकांमध्ये दिवाळीच्या दिवसांत मोठा रोष निर्माण झाला आहे. स्थायी समिती तसेच पालिका सभागृहात पाणी प्रश्नांवर गेल्या काही दिवसांपासून घमासान सुरू आहे. वाढत चाललेल्या या समस्येची दखल पालिका प्रशासनाने घेतली असून पाणीपुरवठय़ाची समस्या निर्माण झालेल्या ठिकाणी सुधारणा करण्यासाठी उपाययोजना जलअभियंत्यांनी हाती घेतल्या आहेत. यामध्ये देवनार कॉलनी येथील 900 आणि 150 मिलीमीटर, ट्रॉम्बे येथील जलाशयाजवळ 1200 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी, मानखुर्द चिता कॅम्पजकळ 900 मिलीमीटर व्यासाची, गोवंडी येथे 600 मिलीमीटर व्यासाची तसेच इतर लहान जलवाहिन्या बदलण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांसाठी 8 कोटी 82 लाख रुपयांच्या जलवाहिन्यांच्या कामांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली.

गळती, दूषित पाणीपुरवठ्याला आळा घालणार
शहरातील काही उच्चभ्रू वस्तींमध्येही पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऑपेरा हाऊस ते एन. एस. रोड जंक्शन, खाडिलकर रोड गिरगाव, ताडदेव सर्कल ते ग्रॅण्ड ईस्टर्न रॉयल ते बेलासिस रोड, भोईवाडा लेन तसेच भायखळा, ग्रँट रोड आदी भागांत तसेच दादर, माटुंगा, परळ आणि एल्फिन्स्टन या भागांत दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची चिंता नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर गळती आणि दूषित पाणीपुरवठा थांबविण्याची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी 2 कोटी 17 लाखांची कामे दिवाळीनंतर सुरू होतील.