कोहली खेळणार; नव्यांना संधी मिळणार,  विंडीज दौर्‍यासाठी आज ‘टीम इंडिया’ची निवड

26

सामना प्रतिनिधी । मुंबई

वेस्ट इंडीज दौर्‍यासाठी लांबलेली ‘टीम इंडिया’ची निवड आज मुंबईमध्ये होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासन समितीने (सीओए) ‘बीसीसीआय’च्या सचिवांना या संघनिवड समितीच्या बैठकीत सहभागी होण्यास मज्जाव केला आहे. कर्णधार विराट कोहलीने विंडीज दौर्‍यासाठी आपण उपलब्ध असल्याचे ‘बीसीसीआय’ला कळविले आहे. मात्र, तरीही विंडीज दौर्‍यासाठी काही नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर हिंदुस्थानी संघात बदल होण्याची शक्यता असल्यामुळे रविवारच्या बैठकीकडे सर्कांचे लक्ष असणार आहे. या बैठकीला निवड समितीच्या पाच सदस्यांसह कर्णधार कोहलीही उपस्थित राहणार आहे.

नव्या चेहर्‍यांबाबत उत्सुकता

कर्णधार विराट कोहली विंडीज दौर्‍यासाठी उपलब्ध असला, तरी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार या वेगवान त्रिकुटाला संघनिवड समिती विश्रांती देऊ शकते. बुमराही सातत्याने क्रिकेट खेळत आहे, तर भुवनेश्कर कुमार अजूनही पूर्णपणे तंदुरूस्त झालेला नाही. त्यामुळे नवदीप सैनी, दीपक चहर व खलील अहमद या नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर कृणाल पांडय़ा, मनिष पांडे, श्रेयस अय्यर आणि शुबमन गिल यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. हे सर्व खेळाडू सध्या हिंदुस्थान अ संघासोबत वेस्ट इंडिज दौर्‍याकरच आहेत. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे दुखापतीमुळे याही दौर्‍यासाठी उपलब्ध नसतील.

पंतला संधी मिळणार

आगामी वर्षी ऑस्ट्रेलियात होणार्‍या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संघनिवड समिती युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंतला विंडीज दौर्‍यासाठी संधी मिळणार आहे. महेंद्रसिंग धोनीने दोन महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने पंतचा मार्ग मोकळा झाला आहे. विश्वचषक स्पर्धेत शिखर धवनला दुखापत झाल्यानंतर रिषभ पंतला पाचारण करण्यात आले होते. पंतने समाधानकारक फलंदाजी करून संघनिवड समितीला आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. ‘टीम इंडिया’चा विंडीज दौरा 3 ऑगस्टपासून सुरू होणार असून, या द्विपक्षीय मालिकेत तीन टी-20, तीन एकदिवसीय व दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या