
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने वादात राहुनही बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. असे असले तरी सोशल मीडियावर अजूनही बॉलिवूडविरोधात विधान आणि टीका होत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशाची संस्कृती आणि सन्मान यांना ठेच पोहोचवणारी एखादी गोष्ट चित्रपटात असल्याचं लक्षात आलं की तात्काळ ‘बॉयकॉट बॉलिवूड’ ट्रेंड सुरू होतो.
मराठी वृत्तवाहिनी ‘एबीपी माझा’च्या वृत्तानुसार महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार हे आता बॉलिवूडमधील कलाकारांवर आणि त्यांच्या मनमानीवर अंकुश ठेवण्यासाठी एक नवी नियमावली जाहीर करणार आहेत. बॉलिवूडमध्ये काम करणारे कलाकार, कामगार, निर्माते यासगळ्यांसाठी ही नवी नियमावली लागू असेल असं या वृत्तात म्हटलं आहे.
बॉलिवूडमध्ये समान वेतनाची गंभीर समस्या आहे. त्याविरोधात अनेकदा आवाज उठवण्यात आला आहे. त्यामुळेच नवी नियमावली जारी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं आहे.
राज्यसरकारच्या नियमानुसार आता निर्मात्यांनं प्रत्येकाला समान वेतन देणं भाग पडणार आहे. मात्र त्याची संपूर्ण माहिती अजून समोर आलेली नाही. तसंच मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या व्यक्तीची तक्रार नोंदवण्यासाठी एक स्वतंत्र नवं पोर्टल देखील तयार करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
मनोरंजक्षेत्र म्हणजेच चित्रपटासोबत मालिका, जाहिराती, ओटीटी क्षेत्रासाठी देखील हे नियम लागू होणार आहेत. शिवाय महिला कलाकार आणि कामगारांना वाहतूक सुविधा देखील देण्यात यावी असा नियम देखील यात असल्याचं बोललं जात आहे.
दरम्यान, नवी नियमावलीसाठी शिंदे-फडणवीस सरकारने सांस्कृतिक विभागाची मदत घेतल्याचं देखील कळत आहे.
































































