
सामना प्रतिनिधी। न्हावाशेवा
कळंबोलीवरून उरण शहराकडे येणाऱ्या एन एम एम टीच्या बसला उरण शहराकडून नवी मुंबई शहराकडे जाणाऱ्या रिक्षाने जोरदार धडक दिली. यात रिक्षाचालक व दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तु.ह.वाजेकर फुंडे महाविद्यालयाच्या बस थांब्या जवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
एन एम एम टीची ही बस सकाळी 5.30 च्या सुमारास कळंबोली बस स्थानकाकडून उरण शहराकडे निघाली होती. तु.ह.वाजेकर महाविद्यालयाच्या बस थांब्या जवळ बस आली असता, उरण शहराकडून येणाऱ्या ऑटो रिक्षाचालकांनी एन एम एम टीच्या बसला जोरदार धडक दिली.
या अपघातात रिक्षाचालक व त्यात बसलेले दोन प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ जेएनपीटी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. नंतर पुढील उपचारासाठी नवीमुंबई येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर रिक्षाचालक व प्रवाशी हे मुंबई शहरातील रहिवासी असल्याचे समजले मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत.

































































