
‘नीट’ पेपरफुटीवरून काही महिन्यांपूर्वी देशभरात मोठा वाद निर्माण झाला होता. पेपरफुटी रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय कृती समिती स्थापन केली होती. पेपरफुटी रोखण्यासाठी तसेच संपूर्ण परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्यासाठी या समितीने एक मास्टर प्लॅन तयार केला आहे. ऐनवेळी प्रश्नपत्रिका तयार करणे, एआयची मदत घेणे तसेच ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेणे आणि अशा ऑनलाइन परीक्षा केंद्रांची संख्या वाढवणे यासारख्या उपाययोजना या मास्टर प्लॅनमध्ये असल्याचे संकेत नंदन निलेकणी यांनी दिले आहेत.
एका कार्यक्रमात बोलताना निलेकणी यांनी पेपरफुटी रोखणे तसेच ‘नीट’ परीक्षा व्यवस्थेतील आगामी बदलांबाबत संकेत दिले. निलेकणी यांनी सर्वप्रथम प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या पद्धतीतच बदल करण्याचे सूतोवाच केले. ते म्हणाले, “एकाच प्रश्नपत्रिकेची गरज काय? प्रश्नपत्रिका तयार झाली की ती विकून पैसे कमावण्याचा मोह होतो. त्यामुळे आधीच प्रश्नपत्रिका तयार करण्याऐवजी प्रश्नांचा मोठा संग्रह तयार करावा आणि अगदी शेवटच्या क्षणी त्या दिवसाची प्रश्नपत्रिका तयार करणे हा उपाय ठरू शकतो. त्यामुळे विकण्यासाठी प्रश्नपत्रिका उपलब्धच राहणार नाही,” असे निलेकणी म्हणाले.
एआयचीदेखील मदत घेणार
प्रश्नपत्रिका तयार करताना एआयची मदत घेण्याबाबत निलेकणी म्हणाले की, नक्कीच एआयची मदत घेता येऊ शकते. अनेक मुद्दे आहेत, ज्यावर समिती विचार करत आहे. यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे निलेकणी म्हणाले.
सर्व परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात
पेपरफुटी रोखण्यासाठी सर्व परीक्षा संगणक-आधारित चाचणीद्वारे (CBT) घेतल्या पाहिजेत. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा झाल्यास पेपरफुटीची शक्यता राहणार नाही. मात्र, यासाठी मोठ्या प्रमाणावर नेटवर्क कनेक्टिव्हिटीची गरज आहे. सध्या अशी दीड लाख परीक्षा केंद्र आहेत. ही संख्या वाढवण्याची गरज आहे, असे निलेकणी म्हणाले.






























































