
सामना प्रतिनिधी, पारनेर
पिंपळनेर येथील संत निळोबाराय देवस्थानपासून निघणाऱ्या सोपानकाका औटी यांच्या नेतृत्वाखालील आषाढी दिंडीस संत निळोबाराय संस्थानने परवानगी नाकारली आहे. सोपानकाका यांनी संस्थानच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या निळोबारायांच्या पालखी सोहळ्यात सन्मानाने सहभागी व्हावे, संत निळोबांच्या नावाने दुसरी दिंडी काढू नये असे आवाहनही देवस्थानच्या विश्वस्तांनी केले आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख पाच संतांपैकी एक व संत परंपरेतील शेवटचे संत म्हणून ओळख असलेल्या संत निळोबारायांचे संजीवन समाधी स्थळ तालुक्यातील पिंपळनेर येथे आहे. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या धर्तीवर पिंपळनेर येथून गेल्या वर्षीपासून पालखी सोहळा सुरू करण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अध्यक्षतेखालील या सोहळ्यास पहिल्याच वर्षी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नगर व पुणे जिल्ह्यातील अनेक दिंड्यांनी या पालखी सोहळ्यात सहभाग नोंदविला. आषाढी वारीच्या शासकीय नियोजनात पिंपळनेर देवस्थानला समाविष्ट करून घेण्यात आले असून पंढरपूर देवस्थान समितीनेही निळोबांच्या पालखी सोहळयास मान्यता दिली आहे. दरवर्षी आषाढी दशमीला निळोबारायांच्या वंशजास महाप्रसाद पूजेचा मान देण्यात आलेला आहे.
मागील वर्षी सोहळ्याचे नियोजन करताना सुरुवातीस सोपानकाका औटी यांनी बैठकीत सहभाग घेतला. त्यानंतर मात्र ते सोहळ्यात सहभागी झाले नाहीत. त्यांनी स्वतंत्र दिंडी काढून ती पंढरपूरपर्यंत नेली. तालुक्यातील वारकरी एकत्र येत असताना सोपानकाका यांनी संत निळोबारांच्या नावाने वेगळी दिंडी काढू नये ही देवस्थानसह पिंपळनेर ग्रामस्थांची भावना आहे. संस्थानचा प्रस्ताव धुडकावून लावीत यंदाही सोपानकाका यांनी पंढरपूर येथील सेवा आश्रमाच्या विद्यमाने सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याचे भित्तीपत्रक प्रसिद्ध केले. त्यावर पिंपळनेर येथील नागरिकांची संमती न घेता नावे प्रसिद्ध करून देवस्थानमध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न औटी यांनी केल्याचे संस्थानच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.
विनंती करूनही सोपानकाका आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने देवस्थान विश्वस्तांच्या बैठकीत संत निळोबाराय संस्थानशिवाय इतर कोणासही संत निळोबाराय यांच्या नावाने दिंडी, पालखी सोहळा काढता येणार नाही असा ठराव करण्यात आला. या ठरावाच्या प्रती पोलीस अधीक्षक तसेच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून ठराव करूनही पिंपळनेर येथून कोणी दिंडी अथवा पालखी सोहळा काढण्याचा प्रयत्न करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.




























































