
हरिद्वार येथे सुरू असलेला कुंभमेळा कोरोनाचा सुपर स्प्रेडर ठरला असून, 72 तासांत 1700 वर कोरोना रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कुंभमेळ्यात सहभागी झालेले निर्वाणी आखाडय़ाचे महामंडलेश्वर कपिल देव यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
मध्यप्रदेशातील निर्वाणी आखाडय़ाचे महामंडलेश्वर कपिल देव यांचा शिष्य परिवार मोठा आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना डेहराडूनच्या कैलास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. कुंभमेळ्यात कोरोनामुळे साधू-संतांचा मृत्यू होण्याची पहिली घटना आहे.
कुंभमेळ्यात आणि 14 एप्रिलला दोन शाही स्नानावेळी भाविक साधु-संतांची प्रचंड गर्दी उसळली होती. यावेळी तब्बल 50 लाख भाविकांनी गंगा स्नान केले. यावेळी मास्क वापर, सोशल डिस्टंन्सिंग या नियमांचे पालन झाले नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढल्याचे दिसत आहे.
























































