काव्यधारा – देहार्त

>> नीती मेहेंदळे

मन सखोल आहे कळले मजला आज
माझ्याच पायऱया मोजत गेले सहज

अंधारगर्भ तो प्रसवत गेला माया
ही मी नाही ही एकांताची किमया

आतात दिसे लावण्य आत्मज्वालांचे
मौनात दंग गर्भस्थल पाषाणाचे

मी शापित यक्षी उभी तमार्त तळाशी
मग नजर भिडवली ज्ञात शिल्पवृदांशी

मी मुक्त होऊनी त्यजले मूर्तजिवाला
मन अनावृत्त अर्पियले काळोखाला

नक्षत्र घेतले गोंदून विझता वणवण
आकाश उतरले खोलखोल आतून

ते श्वास कळय़ांचे देह झाकतो आहे
बघ कातळगुंफा जिवात रुजली आहे

मूळ कविता

अवगाहन

मी उतरत गेले सलग स्वतःच्या आत
एकेक पायरी बुडे गहनखोलात
अंधार ओतुनी सारविला एकांत
मज आधाराला केवळ माझा हात
तळगुंफेमध्ये लवथवणाऱया ज्वाळा
पाषाणमौन मोडेल कोण वेल्हाळा
शिल्पांची दृष्टी खिळली माझ्यावरती
मी भग्न यक्षिणी माझी माझ्यापुरती
टाकून चमकत्या गतजन्माची कात
मी नग्न मनाने विरले अंधारात
संपता भुयारे एक तोडिला तारा
माझ्यात नभाचा पुंभ खोल जाणारा
देहात लपवुनी कळय़ाफुलांची गाथा
मी रक्तबीज मातीत रुजविले आता

कवयित्री: जयश्री हरी जोशी

कवयित्रीचा संक्षिप्त परिचय

जयश्री हरी जोशी, जन्म पुणे, शालेय शिक्षण हुजूरपागा, स. प. महाविद्यालय. जर्मन, फिलॉसॉफी, संस्कृत. जेएनयू, दिल्ली येथे एमए आणि एमफिल, जर्मन साहित्य आणि संस्कृती. जर्मन – मराठी, (नक्षी-दार, तास वाजे झणाणा – पॉप्युलर)  मराठी – जर्मन (शांतता कोर्ट चालू आहे) हिंदी – जर्मन (अंतर्नाद – सरिता गुप्ता यांच्या कविता व प्रदर्शन पुस्तिका)  जर्मन – हिंदी (मासूम लोगों का वक्त – झीगफ्रिड लेंत्झ) मराठी – इंग्लिश (दृश्यकला कोष) जर्मन – इंग्लिश (एरिश फ्रीड, रायनर मारिया रिल्पं, हिल्डं डोमिन, माशा कालेको). हिंदी-मराठी (मंगलेश डबराल) चार अनुवादित पुस्तके प्रकाशित.  मराठीत कविता लेखन आणि ललितबंध. नियतकालिके आणि वर्तमानपत्रांत साहित्यविषयक लेखन. ग्योथे इन्स्टिटय़ूट मॅक्सम्युलर भवन या जर्मन सांस्कृतिक संस्थेत समन्वयक आणि माहिती व ग्रंथालय विभागप्रमुख म्हणून कार्यरत. आंतरराष्ट्रीय नाटय़ समीक्षक परिषदेच्या सदस्य. उलरिपं ड्रेसनर आणि अरुणा ढेरे यांच्या समवेत जर्मन कवितांचे अनुसर्जन ‘साक्षीभावाने बघताना’ रोहन प्रकाशनतर्फे प्रसिद्ध.