
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं वृत्त आहे. नागपूर येथील गडकरी यांच्या कार्यालयात धमकी देणारा फोन आला होता. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या नावे ही धमकी देण्यात आली असून खंडणीची मागणी करण्यात आली आहे.
धमकी मिळाल्याची माहिती मिळताच नागपूर पोलिसांसह एटीएस, एएनओसह अन्य सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गडकरी यांच्या वर्धारोडवरील निवासस्थानावर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयाजवळ पोलिसांचा ताफा सुरक्षेसाठी तैनात करण्यात आला आहे. नितीन गडकरी यांचे खामल्यात जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता फोन आला. फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगून नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि काही सेकंदातच त्याने फोन कट केला.
हा फोन घेणाऱ्याने लगचे भारतीय जनता पक्षातील वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. अर्ध्या तासातच गडकरी यांच्या संपर्क कार्यालयास पोलिसांनी वेढा घातला. तसेच दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलवाद विरोधी पथकासह अन्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
गडकरी यांच्या कार्यालयासह घराभोवती शस्त्रधारी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली असून घराकडे आणि जनसंपर्क कार्यालयाकडे जाणारे रस्ते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहेत. नागपूर पोलिसांची बॉम्ब शोधक-नाशक पथक आणि श्वानपथकहा सज्ज ठेवण्यात आले आहे.




























































