
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊनचे नियम कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे वीज कर्मचाऱयांना ग्राहकांच्या वीज वापराचे प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेण्यावर मर्यादा येणार आहेत. त्याची दखल घेत ग्राहकांनी स्वतःतच आपल्या वीज वापराचे मीटर रीडिंग मोबाईल ऍपच्या माध्यमातून महावितरणकडे पाठवावे, असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. तसेच महावितरणनेही ग्राहकांकडून येणाऱया तक्रारी प्राधान्याने सोडवाव्यात. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घ्यावी असे निर्देश दिले आहेत.
वीज बिल व थकबाकीबाबत आज ऊर्जामंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी ऊर्जामंत्र्यांनी ग्राहकांच्या तक्रारी तत्काळ सोडविण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेला अलर्ट करण्याचे निर्देश महावितरणला दिले. याआधी लॉकडाऊन असताना महावितरणने सरासरी वीज वापराच्या आधारे ग्राहकांना वीज बिले पाठवली होती.
तेव्हा वाढीव वीज बिले आल्याच्या तक्रारी ग्रहकांकडून आल्या होत्या. त्यामुळे वीज कर्मचाऱयांनी प्रत्यक्ष मीटर रीडिंग घेऊनच वीज बिल देण्याचा प्रयत्न करावा असेही नितीन राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महावितरणने ग्राहकांना तक्रार करण्यासाठी ऑनलाइन व मोबाईल ऍपची सोय करून दिली आहे. तरीही जे ग्राहक त्याचा वापर करू शकत नाही त्यांच्यासाठी स्थानिक कार्यालयात ऑफलाइन तक्रारी नोंद करून घेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश ऊर्जामंत्र्यांनी दिले. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल आदी उपस्थित होते.




























































