
रत्नागिरीच्या खेड तालुक्यात कोसळत असलेल्या धुंवाधार पावसामुळे ग्रामीण भागातील नद्या-नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणच्या नाल्यांवर पूल किंवा साकव नसल्याने शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदी ओलांडावी लागत आहे. नांदिवली गावच्या दंडवाडी-ढेबेवाडी दरम्यानच्या ओढ्यावर साकव नसल्याने ढेबेवाडीतील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ओढ्यापलीकडील शाळेत जावे लागत आहे. दोन दिवसापूर्वी ओढ्याला पूर आल्याने पलीकडच्या शाळेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे पालक अतिशय धोकादायक स्थितीत हाताला धरून ओढा ओलांडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका ग्रामस्थाने सोशल मीडियावर पोस्ट केलेला हा व्हिडीओ लोकप्रतिनिधींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.
नांदिवली गावातील ढेबेवाडी ही अतिशय दुर्गम भागात वसलेली आहे. या वाडीवर जिल्हा परिषदेची शाळा नसल्याने या वाडीतील सुमारे 12 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ओढ्याच्या पलीकडे असलेल्या दंडवाडी येथे यावे लागते. उन्हाळ्यामध्ये या विद्यार्थ्यांची फारशी गैरसोय होत नाहीत पण पावसाळ्यात या दोन वाड्यांमधील ओढा ओलांडून शाळेत जायचे म्हणे विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्यासारखे आहे. पावसाळ्यात ढेबेवाडीतील ग्रामस्थ आणि विद्यार्थी यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी या ओढ्यावर साकव बांधण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थ गेली अनेक वर्षे करत आहेत मात्र शासनाने दुर्लक्ष केल्याने पावसाळ्यात जीव मुठीत धरून ओढा पार कारण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.
अतिवृष्टीदरम्यान ग्रामीण भागातील बहुतांशी नद्यांना आणि ओढ्यांना पूर येतो. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या गावांमध्ये नद्या किंवा ओढ्यांवर साकव किंवा छोटे पूल आहेत मात्र अनेक गावातील नद्या आणि ओढ्यांवर साकव किंवा पूल नसल्याने येथील ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून नदी किंवा ओढा ओलांडावा लागतो. काही ठिकाणी नदी ओलांडताना दुर्घटना देखील घडलेल्या आहेत. नदी ओलांडणारे शेतकरी, महिला वाहून गेल्या आहेत मात्र तरीही शासनाकडून ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामीण भागाचा कोणी वाली आहे का? असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.
नांदिवली दंडवाडी आणि ढेबेवाडी दरम्यानच्या ओढ्यावर साकव नसल्याने येथील विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ओढा ओलांडावा लागत आहे. पावसाचा जोर वाढला तर ओढ्याचे पाण्यात वाढ होऊन ओढा ओलांडताना विद्यार्थ्यांच्या बाबतीत दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही दुर्दैवाने जर एखादी दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? असा प्रश्न येथील पालकांनी उपस्थित केला आहे.



























































